दिल्लीकर आणि मुंबईकरांमध्ये खटके उडणं तसं काही नवीन नाही. दिल्ली वरचढ की मुंबई यावरुन नेहमीच दोन्ही शहरातील नागरिकांमध्ये जुंपते. तशी पुन्हा एकदा जुंपली आणि यावेळी कारण होतं एका दिल्लीकरानं मुंबईतील ट्राफिकबाबत केलेलं ट्विट. उद्योजक भौमिक गोवंडे यांनी त्याच्या एक्स हँडलवर त्यांना मुंबईत आलेला अनुभव शेअर केला. यात त्यांनी मुंबईतील ट्राफिकनं मला मिडल क्लास असल्याचं फील दिलं, असं म्हटलं आणि वादाला तोंड फुटलं.
गोवंडे यांनी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतरचा अनुभव सांगितला. विमानतळातून बाहेर पडल्यानंतर प्रचंड वाहतूक कोंडीला त्यांना सामोरं जावं लागलं. ट्विटमध्ये ते म्हणाले, "नवी दिल्लीतून मुंबईला लँड झाल्यानंतर विमानतळाबाहेर मला तिसऱ्याच जगात आल्यासारखं वाटलं. देवा या शहरातील ट्राफिकने मला खरंच मिडल क्लास फील दिलं. अक्षरश: वीट आणला". गोवंडे यांनी ट्विटमध्ये वेळ आणि ठिकाणही पुढे सांगितलं. गुरुवारी संध्याकाळी सव्वासात वाजता विमानतळावर उतरलो आणि ८ वाजून ४ मिनिटांनी विमानतळाबाहेर आलो. ८ वाजून ४४ मिनिटं झाली तरी मी विमानतळापासून फक्त ६०० मीटर अंतरावरच पोहोचू शकलोय, असं गोवंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
गोवंडे यांचं ट्विट व्हायरल झालं आणि वाद सुरू झाला. काहींनी मुंबईच्या ट्रॅफिकबद्दलच्या मुद्द्याला सहमती दर्शवली पण त्यांनी मुंबईचा उल्लेख मिडल क्लास असा केल्यानं अस्सल मुंबईकरांनी मात्र गोवंडे यांची 'शाळा' घेतली.
एका मुंबईकर यूझरनं रिप्लाय देत दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेवरुन टोला लगावला. "इथलं ट्राफिक मिडल क्लास असू शकेल पण इथल्या हवेची गुणवत्ता टॉप क्लास आहे". तर एका यूझरनं गोवंडे यांच्या ट्विटची खिल्ली उडवत जसं काय नवी दिल्ली जागतिक शहर आहे असं म्हटलंय.
दिल्ली-मुंबई वाद तसा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. गोवंडे यांच्या ट्विटनं त्याला आणखी एक फोडणी मिळाली. "तुम्हाला मुंबई हे शहर सर्वोत्तम वाटत नसेलही पण गेल्या काही वर्षांमध्ये शहराची ओळख बदलली आहे. जगायला शिकवणारं हे शहर आहे. एकदा तुम्हाला या शहराची सवय झाली की हे शहर सोडणं तुम्हाला कठीण होऊन बसेल. तुम्हाला नक्कीच इथं उत्तम आयुष्य आणि माणसं गवसतील", असंही एका मुंबईकरानं म्हटलं आहे. काहींनी दिल्ली-मुंबईची तुलनाही केली आहे. तर एकानं दिल्ली आणि मुंबईत ट्राफिकची समस्या समान असल्याचं म्हटलं आहे. "जेव्हा ट्राफिकचा विषय येतो तेव्हा दिल्ली आणि मुंबईत सारखीच परिस्थिती आहे. पण जेव्हा हवेच्या गुणवत्तेची बाब येते तेव्हा नक्कीच मुंबई उजवी ठरते. इथं जगण्यासाठी किमान २४ तास मास्क लावून फिरावं लागत नाही", असं एका मुंबईकरानं म्हटलं आहे.
काहींनी गोवंडे यांच्या ट्विटचं समर्थन देखील केलं आहे. "मुंबईला खरंच आणखी उड्डाणपुलांची नितांत गरज आहे. मुंबईत गाडी चालवणं हे वाईट स्वप्नासारखं आहे", असं एकानं म्हटलंय.