Join us

Mumbai Traffic: व्हीआयपींमुळे मुंबईत ‘ट्रॅफिक जॅम’! रोजच्या रोज लांबच लांब रांगा, नागरिक हैराण, नोकरदारांची बिकट ‘वाट’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 9:00 AM

Mumbai Traffic: गेल्या काही दिवसांपासून व्हीआयपींसाठी रस्ते मोकळे करून देण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पड आहे. याचा नाहक मनस्ताप प्रवशांना सहन करावा लागत आहे.

Mumbai Traffic:मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. दररोज कोट्यवधी लोक रेल्वे, रस्ते, मोनो रेल, मेट्रो, बेस्ट बस आदींमधून प्रवास करत असतात. यात रस्त्यांनी प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, दिवसेंदिवस वाढत चालेल्या मुंबईतीलवाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. यातच व्हीआयपींमुळे वाहतूक थांबवली जाते. त्यांना प्राधान्य दिले जाते, यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते. गेल्या काही दिवसांमध्ये हे प्रकार वाढल्याचे सांगितले जात आहे. 

मुंबईत अनेकविध कंपन्यांची कॉर्पोरेट ऑफिसेस, विविध न्यायालये, सरकारी ऑफिसेस, बाहेरील देशांची ऑफिसेस, कार्यरत आहेत. याशिवाय राजकीय पक्षांची कार्यालये आहेत. मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांची मुंबईत नेहमीच रेलचेल असते. याशिवाय, अतिमहत्त्वाच्या लोकांचीही ये-जा मुंबईत सुरू असते. अशावेळी नेतेमंडळी आणि महत्त्वाच्या व्यक्तींसाठी अन्य वाहतूक थांबवली जाते आणि त्यांना प्राधान्य देत रस्ते मोकळे केले जातात. याचा सामान्य मुंबईकरांना अधिक त्रास सहन करावा लागतो. याचे कारण आधीच वाहतूक कोंडीतून मार्ग काढत प्रत्येकाला कामाचे ठिकाण गाठायचे असते, त्यातच महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वाहतूक अडवल्यामुळे अधिक वाहतूक कोंडी होते. 

या प्रकरणी काहीतरी मार्ग काढण्याची मागणी

नेतेमंडळी आणि महत्त्वाच्या व्यक्तींसाठी रस्ते मोकळे करून त्यांना प्राधान्य देणे, यासाठी वाहतूक अडवणे हे प्रकार गेले काही दिवस वाढल्याचे निदर्शनास आले असून, याबाबत काहीतरी ठोस पावले उचलावीत किंवा यातून काही मार्ग काढावा, अशा प्रकारची मागणी केली जात आहे. सामान्य मुंबईकरांकडून अशा प्रकारची मागणी जोर धरू लागली आहे. मुंबई ट्रॅफिक पोलीस, प्रशासन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात लक्ष घालायला हवे, असेही म्हटले जात आहे. लोकमत मीडियाचे संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी ट्विटच्या माध्यमातून मुंबईकरांच्या या समस्येकडे लक्ष वेधलं आहे.

मेट्रोची कामे, पुलाची कामे, त्यात व्हीआयपींची भर

मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रो प्रकल्प, उड्डाणपुलाची कामे, रस्त्यांची कामे सुरुच आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढलेली आहे. त्यात व्हीआयपींची भर पडल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. मुंबईत अनेक ठिकाणी याचा अनुभव हजारो प्रवासी नेहमी घेत असतात. त्यामुळे नाहक मनस्तापही करावा लागतो. तासन् तास वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर होत असल्याची बाबही निदर्शनास आणली जात आहे. तसेच दररोज हीच समस्या असून, त्यावर तातडीने काहीतरी उपाययोजना करावी, अशीही मागणी वाढू लागली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मुंबईवाहतूक कोंडी