नेमकी कसली वसुली सुरू आहे? अमोल कोल्हेंच्या गंभीर आरोपांना वाहतूक शाखेचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 04:28 PM2023-12-02T16:28:06+5:302023-12-02T16:31:32+5:30
अमोल कोल्हेंनी 'एक्स'वर लिहिलेल्या पोस्टला प्रत्युत्तर देत मुंबई वाहतूक पोलिसांनी वसुलीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी आज एक व्हिडिओ शेअर करत मुंबई वाहतूक शाखेवर वसुलीचे गंभीर आरोप केले. हे आरोप करताना अमोल कोल्हे यांनी वाहतूक शाखेच्या महिला पोलिसाच्या मेसेजचाही दाखला दिला होता. मात्र आता या सगळ्या प्रकारावर मुंबई वाहतूक पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून आपण माहिती घेऊन संदेश प्रसारित करणं अपेक्षित होतं, असं पोलिसांनी अमोल कोल्हेंना उत्तर देताना म्हटलं आहे.
अमोल कोल्हेंनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टला प्रत्युत्तर देताना मुंबई वाहतूक पोलिसांनी म्हटलं आहे की, "महोदय, मुंबई शहरात मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केलेल्या १.३१ कोटींपेक्षा अधिक ई-चालानधील ६८५ कोटी रूपयांपेक्षा अधिक दंडाची रक्कम १ जानेवारी २०१९ पासून प्रलंबित आहे. ही दंडनीय रक्कम शासनजमा करण्यासाठी व वाहतुकीच्या नियंमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांमधे वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी शनिवार व रविवार या दिवशी दंड वसुलीची मोहिम हाती घेण्यात येते," अशी माहिती पोलिसांनी दिली.
"अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करणारा संदेश समाजमाध्यमावर प्रसारित करण्यापूर्वी आपण जबाबदार लोकप्रतिनिधी असल्याने पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थितीची माहिती घेऊन आपण संदेश प्रसारित करणे अपेक्षित होते," अशा शब्दांत वाहतूक पोलिसांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काय होते अमोल कोल्हेंचे आरोप?
मुंबईतून बाहेर पडताना सिग्नलवर आलेला अनुभव सांगताना अमोल कोल्हे यांनी म्हटलं होतं की, "एका सिग्नलवर वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी माझी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाइन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः हा काय प्रकार आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वाहतूक शाखेच्या त्या भगिनीने थेट मोबाइलवरील मेसेज दाखवला. प्रत्येक चौकात २५ हजार रुपयांची वसुली व्हावी आणि २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असा उल्लेख त्या मेसेजमध्ये होता," असा दावा कोल्हे यांनी केला होता.
आजचा धक्कादायक अनुभव-
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 2, 2023
मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेताना त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला- प्रत्येक चौकात २५००० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे!… pic.twitter.com/TJ3oq2oSsO
दरम्यान, संबंधित खात्याचे मंत्री किंवा अधिकाऱ्यांनी यावर खुलासा करावा, अशी मागणीही अमोल कोल्हेंनी केली होती.