मुंबईकरांनो! तुमची वाहने टो केली जाणार नाहीत; नव्या पोलीस आयुक्तांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 08:27 AM2022-03-06T08:27:26+5:302022-03-06T08:27:53+5:30
नियम पाळले तर पोलीस गाडी उचलणार नाहीत; एक आठवडा वाहने न उचलण्याची सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईमध्ये पार्किंगची मोठी समस्या आहे. वाहनधारक कळत-नकळतपणे वाहने नो पार्किंगमध्ये लावतात; मग पोलीस ती उचलून नेतात. अशा प्रकारच्या कारवाईमुळे अनेकदा पोलिसांवर टीका केली जाते. मात्र वाहने उचलून नेणे थांबवत आहोत. मुंबईकरांनी जर नियमांचे पालन केले तर अशी कारवाई करणे थांबविले जाईल, असे मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी म्हटले आहे.
बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गेल्यानंतर काही वेळासाठी दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला वाहनाचे पार्किंग करतो. या काही मिनिटांच्या अवधीतच वाहतूक पोलिसांचा टेम्पो येऊन दुचाकी घेऊन जातो. मुंबईत अनेक बाजारपेठांच्या परिसरात पार्किंगची व्यवस्था नाही. काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे, पण ती बाजारपेठेपासून लांब आहे. तसेच रस्त्यालगत असलेल्या वाहनांच्या पार्किंगच्या जागेत व्यावसायिक बसलेले असतात. त्यामुळे नाइलाजास्तव रस्त्यावर वाहन पार्क केले जाते. अशा वाहनांवर केली जाणारी कारवाई आता एक आठवडा थांबणार आहे. याबाबतच्या सूचना मुंबई पोलीस आयुक्तांनी वाहतूक पोलिसांना दिल्या आहेत. मुंबईकरांनी नियमांचे पालन केल्यास यापुढेही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
प्रिय मुंबईकरांनो, आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे. सर्वांत आधी आम्ही वाहने उचलून नेणे थांबवीत आहोत. आपण सर्वांनी जर नियमांचे पालन केले तर प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रयोग नियमित करण्यात येईल. तुम्हाला काय वाटते ते मला नक्की सांगा!
- संजय पांडे,
पोलीस आयुक्त, मुंबई