Join us

मुंबईत वाहतूक पोलीस लवकरच १६ वाहतूक चौक्या वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:09 AM

मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम ...

मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो. वाहतुकीला प्रतिसाद देण्यासाठी पोलिसांची संख्या वाढावी आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलीस लवकरच १६ वाहतूक चौक्या वाढविणार आहे. सध्या मुंबईत ३४ वाहतूक चौक्या असून २८०० वाहतूक पोलीस कार्यरत आहेत.

मुंबईत काही वाहतूक चौक्यांमध्ये जास्त अंतर आहे. विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत होण्यास वेळ लागतो. त्या वाहतूक चौक्यांवर ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी वाहतूक चौक्या वाढविल्या जाणार आहेत. त्यामध्ये वाहतूक चौक्यांना जबाबदारी वाटून दिली जाणार आहे. वाहतूक पोलिसांना तात्काळ प्रतिसाद देणे शक्य होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

नवीन वाहतूक चौक्या कुठे करता येतील, याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना जागा निश्चित करण्यास सांगण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांच्या नियोजित पोलीस चौक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील माता रमाबाई आंबेडकर मार्ग, मरीन लाईन, डी बी मार्ग, विक्रोळी ते इस्टर्न एक्स्प्रेस हायवेसाठी कांजूरमार्ग भागात तसेच ट्रॉम्बे वाहतूक पोलीस भार कमी करून मानखुर्द आणि देवनारमध्ये जबाबदारी वाटून दिली जाणार आहे. वाहतूक चौक्यांसाठी आम्ही सरकारच्या विविध प्राधिकरणाशी संपर्कात आहोत. जर सरकारी जमीन किंवा इमारत उपलब्ध नसेल तर आम्हाला चौक्या करण्यासाठी भाड्याने जागा घ्यावी लागेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.