- रतिंद्र नाईक मुंबई - पश्चिम महामार्गावरील आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ ते वांद्रे पर्यंतची वाहतूक कोंडी लवकरच फुटणार आहे. एमएमआरडीए या ठिकाणी पूल उभारणार असून या पुलासाठी आवश्यक असणाऱ्या स्टील गर्डर्सचे लाँचिंग एमएमआरडीए कडून यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे नेहमीच गजबजलेल्या महामार्गावरील वाहतुकीस कोणताही अडथळा न होऊ देता हे काम पूर्ण केले गेले.
येथील पुलावरून सकाळ, संध्याकाळ पीक अवरला प्रचंड वाहतूक कोंडी होते त्यामुळे नवीन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. ६१५ मीटर लांब व ८ मीटर रुंद या नवीन उड्डाणपूला मुळे प्रवाशांना विमानतळावर आणि तेथून इच्छित ठिकाणी लगेच जाता येणार आहे. हा प्रकल्प या वर्षाच्या अखेरीस पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे ध्येय असून त्यासाठी सुमारे ७४ मीटर चे एकूण आठ स्टील आणि पीएससी गर्डर्स स्पॅनची उभारणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे गर्डर्स जमिनीवरून कोणताही आधार न घेता उभारण्यात आले आहेत. एमएमआरडीएने हे जड स्टील गर्डर्स लाँच करण्यासाठी इनव्हर्टेड टी व्यवस्थेचा वापर करून नवीन डिझाइन तयार करण्यात आले आहे. या संरचनेनुसार नुसार उड्डाणपुलाची रचना कमी लांबी आणि कमीत कमी उंचीसह केली गेल्याने खर्चात बचत झाली आहे. हा पूल या वर्षाच्या अखेरीस पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे ध्येय आहे.