Mumbai Traffic Update: मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली आहे. ठिकठिकाणी प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी अलर्ट जारी करत कोणते रस्ते आज प्रवासासाठी टाळावेत याची यादी दिली आहे.
सततच्या पावसामुळे शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते परळ प्रवासासाठी जवळपास दोन तासाहून अधिक कालावधी लागत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे. तर एका प्रवाशानं सांताक्रूझ ते कलिना प्रवासासाठी तब्बल दीड तास लागल्याची माहिती दिली. वांद्रे कुर्ला संकुल परिसरातही वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. बीकेसी ते सांताक्रूझ पश्चिमपर्यंतच्या प्रवासाला अडीच तास लागत आहेत. रस्त्यावरील अपघातांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी शहरातील रस्ते वाहतूकीचे अपडेट्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत.
"दादर टीटी टिळक ब्रिज पुलावर डंपर बंद पडल्याने दक्षिणेकडच्या दिशेची वाहतूक मंदावली आहे", असं ट्विट वाहतूक पोलिसांनी एक्स अकाऊंटवर केलं आहे. तसंच अपघातामुळे भांडूप गाव दक्षिणेकडील वाहतूक मंदावली असल्याचंही अपडेट पोलिसांनी दिलं आहे. सांताक्रूझ येथील वाकोला पुलावर उत्तरेकडे जाणारी वाहतूक टेम्पोच्या अपघातामुळे मंदावली असल्याचंही अपडेट पोलिसांनी दिलं आहे. या रस्त्यांवरुन प्रवास करणं टाळण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.