Join us

Mumbai Train Update : मध्य आणि हार्बरमार्गावर लोकलचा खोळंबा, प्रवाशांचे हाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 22:19 IST

ऐन गर्दीच्या वेळी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. बुधवारी सकाळी लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

ठळक मुद्देऐन गर्दीच्या वेळी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. बुधवारी सकाळी लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. हार्बर रेल्वेवरील कॉटन ग्रीन स्टेशन-शिवडी दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

मुंबई - ऐन गर्दीच्या वेळी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. बुधवारी (10 जुलै) सकाळी लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. हार्बर रेल्वेवरील कॉटन ग्रीन स्टेशन-शिवडी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे मध्य रेल्वेची सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक उशिराने सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी कॉटन ग्रीन स्टेशन-शिवडी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड  झाला आहे. यामुळे हार्बर रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली असून अनेक लोकल खोळंबल्या आहेत. मध्य रेल्वेच्या गाड्या 20 ते 25 मिनिटे उशीराने धावत आहेत. कल्याण, डोंबिवलीहून दररोज हजारो प्रवासी सीएसएमटीच्या दिशेने प्रवास करतात. आज जवळपास 20 मिनिटे लोकल उशिराने सुरू असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

टाटाचा वीजपुरवठा बंद झाल्याने कल्याण-कसारा व कल्याण-कर्जत दिशेकडील मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही वेळात समस्या निकाली निघेल अशी माहिती वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. ए.के.सिंग यांनी दिली आहे. तसेच मध्य रेल्वेवर या बिघाडासंदर्भात रेल्वे स्थानकात उद्घोषणा करुन प्रवाशांना सूचित केले जात आहे. 

शनिवारी सकाळी याआधी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर झाडाची फांदी तुटून ओव्हरहेट वायरवर पडली होती. त्यामुळे मध्य रेल्वेची सीएसएमटीवरून कल्याणला जाणारी वाहतूक खोळंबली होती. तसेच दरम्यान, या खोळंब्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू होती.

मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी (4 जुलै) विस्कळीत झाली होती. कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. या बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू होती. राजेंद्रनगर एलटीटी एक्स्प्रेसचे इंजिन ठाकुर्ली दरम्यान बंद पडले असून ब्रेक जॅम झाले होते. त्यामुळे जलद अपची वाहतूक धीम्या अपवर वळवण्यात आली होती. 10 वाजून 50 मि. ही घटना घडली असून त्या गाडी मागे दोन लोकल रखडल्या होत्या. त्यातील प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून चालत ठाकुर्ली स्थानक गाठले. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू होती.

दरम्यान, आज सकाळी काही तांत्रिक बिघाडामुळे एमएसईटीसीएल आणि टाटा कंपनीकडून होणारा वीजपुरवठा बंद झाल्याने मध्य रेल्वेची कल्याण-कसारा व कल्याण-कर्जत दिशेकडील मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, या बिघाडामागील कारणांचा शोध एमएसईटीसीएलने घेतला आहे. तर टाटा पॉवरने सकाळी साडेनऊ वाजता कल्याल चोला लाईनवरून मध्य रेल्वेला वीजपुरवठा करून खंडित वीजपुरवठा सुरळीत केला, असे टाटा पॉवरकडून सांगण्यात आले आहे. 

 

टॅग्स :मुंबई ट्रेन अपडेटमुंबईमध्य रेल्वेहार्बर रेल्वेलोकल