Join us

Mumbai Train Update : कसाऱ्याजवळ मालगाडीचं इंजिन पडलं बंद, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 1:05 PM

मध्य रेल्वेची वाहतूक रविवारी (२ जून) विस्कळीत झाली आहे. कसारा स्थानकाजवळ मालगाडीचं इंजिन बंद पडल्य़ाने वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे.

ठळक मुद्देमध्य रेल्वेची वाहतूक रविवारी (2 जून) विस्कळीत झाली आहे. कसारा स्थानकाजवळ मालगाडीचं इंजिन बंद पडल्य़ाने वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे.मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.

मुंबई - मध्य रेल्वेची वाहतूक रविवारी (२ जून) विस्कळीत झाली आहे. कसारा स्थानकाजवळ मालगाडीचं इंजिन बंद पडल्य़ाने वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे लागोपाठ दोन कसारा लोकल रखडल्या आहेत. मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. वाहतूक विस्कळीत झाल्याने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये सध्या प्रचंड गर्दी आहे. 

मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी (२८ मे) वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे तब्बल ४५ मिनिटे वाहतूक उशिराने सुरू होती. कल्याण, डोंबिवलीहून दररोज हजारो प्रवासी सीएसएमटीच्या दिशेने प्रवास करतात. जवळपास ४५ मिनिटे लोकल उशिराने सुरू होती. सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल सेवेला फटका बसला होता. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. काही दिवसांपूर्वी कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. डोंबिवलीहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला होता. 

रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

मध्य रेल्वेचा सततचा ‘लेटमार्क’ आणि घामाच्या धारांमुळे कंटाळलेला प्रवासी रविवारी पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनावर वैतागले आहेत. रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक घेतला जात आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मात्र रविवारी ब्लॉकपासून दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणे दरम्यान सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे कल्याणहून सीएसएमटी दिशेकडील सुटणाऱ्या लोकल सेवेत बदल करण्यात आले आहेत. कल्याण ते मुलुंड या दरम्यान लोकल जलद मार्गावर चालविण्यात येत आहे. धिम्या मार्गावरील लोकल सेवा ब्लॉक दरम्यान ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवर उपलब्ध नाही.

सकाळी १० वाजून ५ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ५४ मिनिटांपर्यंत सीएसएमटीहून सुटणारी जलद मार्गावरील लोकल संबंधित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकावर थांबणार आहे. सकाळी ११ वाजून ४० मिनिटांपासून ते ४ वाजून १० मिनिटांपर्यंत हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे लोकल रद्द करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत चुनाभट्टी, वांद्रे ते सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांपासून ते ४ वाजून २३ मिनिटांपर्यंत सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर १ जूनच्या मध्यरात्री वसई रोड ते वैतरणा स्थानकापर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येत आहे. चर्चगेट दिशेकडील जलद मार्गावर १ जूनच्या रात्री ११ वाजून ५० मिनिटांपासून ते २ जूनच्या मध्यरात्री २ वाजून ५० मिनिटांपर्यंत ३ तासांचा हा ब्लॉक असणार आहे. २ जूनच्या मध्यरात्री १ वाजून ३० मिनिटांपासून ते पहाटे ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत ३ तास विरार दिशेकडील जलद मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान दोन्ही दिशेकडील सर्व मेल, एक्स्प्रेस १५ मिनिटे उशिराने धावतील. यासह ६९१४९ मेमू गाडी पहाटे चारच्या सुमारास निघण्याऐवजी ४० मिनिटांनी उशिराने चालविण्यात येत आहेत. 

 

टॅग्स :मुंबई ट्रेन अपडेटलोकलमध्य रेल्वे