सगल पाचव्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा; सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 02:36 PM2019-06-14T14:36:03+5:302019-06-14T14:48:54+5:30
वाहतूक विस्कळीत झाल्याने सलग पाचव्या दिवशी त्रासाला सामोर जावे लागल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक आज सलग पाचव्या दिवशी विस्कळीत झाली आहे. मुलुंड स्थानकादरम्यान शॉर्ट सर्किट झाल्यामुळे मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणारी धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, वाहतूक विस्कळीत झाल्याने सलग पाचव्या दिवशी त्रासाला सामोर जावे लागल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड स्थानकादरम्यान शॉर्ट सर्किट झाल्यामुळे मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणारी धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर, दोन्ही दिशेकडील जाणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल नाहूर, कांजुरमार्ग, विद्याविहार येथे थांबा दिला जात नाही. तर, या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहेत.
दरम्यान, काल सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम झाल्याने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये सध्या प्रचंड गर्दी झाली होती. याआधी बुधवारी (12 जून) कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू होती. तसेच मंगळवारी (11 जून) सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान लोकल 15 ते 20 मिनिटे थांबल्या होत्या. त्यामुळे वाहतूक उशिराने सुरू होती. तर सोमवारी (10 जून) पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
मध्य रेल्वे मार्गावर 79 पंप उपसणार पावसाचे पाणी! पाणी साचू नये म्हणून उपाययोजना सुरू
दरवर्षी थोडा पाऊस पडला तरी रेल्वे रुळावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते. दरवर्षीच्या या रडगाण्याची यंदा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मान्सूनची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील स्थानकांत एकूण 79 पंप मशीन बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मध्य रेल्वे मार्गावर पाणी तुंबण्याची समस्या होते. सहा ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी तुंबते. या भागातून पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप मशीनच्या संख्येत वाढ केली आहे, अशी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पावसाळ्यात मोठा पाऊस पडल्यास रेल्वेचा वेग मंदावतो. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडून जाते. परिणामी, प्रवाशांना पायपीट करत इच्छितस्थळी पोहोचावे लागते. वादळवारा आणि पाऊस पडल्यामुळे झाडे पडण्याच्या घटना, सिग्नल बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे अशा घटना घडतात. त्यामुळे मान्सूनपूर्व काळात रेल्वे हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, नालेसफाई, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करणे, रेल्वे रुळांची स्वच्छता करणे, रेल्वे मार्गात येणाऱ्या लोखंडी वस्तूंना गंजरोधक रंग लावणे अशी कामे सध्या सुरू आहेत. एप्रिलपासून सुरू केलेली कामे मे अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वे प्रशासनाने ठेवले असून आतापर्यंत 70 ते 80 टक्के कामे पूर्ण करण्यात आली आहेत.