Join us

Mumbai Train Update: मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम; प्रवाशांचा खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 10:04 AM

मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस पडत आहे. मांटुगा, वरळी, लालबाग, लोअर परेल परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे, पुर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाने मुंबईकरांचे हाल झालेत.

मुंबई - मागील 24 तासांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवांवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे खोळंबल्या आहेत त्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झालेत. मध्य रेल्वेची वाहतूक 40-45 मिनिटे उशिराने धावत आहेत तर हार्बर रेल्वे 15-20 मिनिटे उशिराने धावत आहेत. 

मध्य रेल्वेवर सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल कुर्ला स्थानकात रखडल्या आहेत. तर पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन्स स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने मरीन लाईन्स-चर्चगेट वाहतूक ठप्प झाली आहे. हार्बर रेल्वेवर मानखुर्द-चुनाभट्टीजवळ ट्रॅकवर पाणी साचलं आहे त्यामुळे येथील लोकल 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. 

मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस पडत आहे. मांटुगा, वरळी, लालबाग, लोअर परेल परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे, पुर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाने मुंबईकरांचे हाल झालेत. तर ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे पालघर जलमय झालं आहे, जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. दक्षिण गुजरात तसेच पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे.

गुजरात,डहाणूवरून मुंबई कडे जाणारी फ्लाईग राणी एक्सप्रेस (8.25 वाजता), वलसाड फास्ट पॅसेंजर(7.10) दिवा-वसई मेमो(8), डहाणू-पनवेल मेमो(6.02), डहाणू-अंधेरी लोकल(5.16), सुरत-विरार शटल(9.31) या गाड्या रद्द झाल्या आहेत. तसेच चर्चगेट वरून डहाणू कडे जाणाऱ्या चर्चगेट डहाणू(6.48 वाजता)(7.26 वाजता),विरार डहाणू(6.08) आदी अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने पालघर तसेच वलसाडला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत 

मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक मार्गावर जामरुंग रेल्वे स्थानकाजवळ पहाटे 4.30 च्या सुमारास मालगाडी घसरली, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली मात्र या घटनेमुळे डाऊन आणि मिडल लाईनवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर मुंबईकडे येणारी वाहतूक सुरु आहे. मालगाडी घसरल्याने सीएसएमटी – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस, सीएसएमटी – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, सीएसएमटी -पुणे डेक्कन एक्सप्रेस, भुसावळ – पुणे एक्सप्रेस, पुणे – भुसावळ एक्सप्रेस, पुणे -पनवेल पॅसेंजर, पुणे सीएसएमटी डेक्कन क्वीन, पुणे सीएसएमटी प्रगती एक्सप्रेस या ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. 

 

Maharashtra Rain Live Updates : कर्जत-खोपोली रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प

टॅग्स :पाऊसमुंबई ट्रेन अपडेटमुंबई