मुंबई - ऐन गर्दीच्या वेळी सोमवारी (11 फेब्रुवारी) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक रखडली आहे. तसेच देवगिरी एक्स्प्रेस टिटवाळा स्थानकात थांबून आहे. जलद आणि धिम्या अशा दोन्ही मार्गांवरील वाहतूक उशिराने सुरू असली तरी यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये सध्या प्रचंड गर्दी आहे.
कल्याण, डोंबिवलीहून दररोज सकाळी हजारो प्रवासी सीएसटीएमच्या दिशेने प्रवास करतात. मात्र आज सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक जवळपास 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर सीएसएमटीहून कल्याणकडे जाणारी वाहतूकही उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वेची वाहतूक नेमकी कशामुळे खोळंबली, याची माहिती अद्याप प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे. मध्य रेल्वे मार्गावरील अनेकांना यामुळे लेट मार्क लागण्याची शक्यता आहे.