Join us

Mumbai Train Update : कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड; हार्बरपाठोपाठ मध्य रेल्वेही ठप्प 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 3:09 PM

कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक ही अर्ध्या तासापासून ठप्प झाली आहे.

ठळक मुद्देकुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प. पावसामुळे कल्याणकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेवरील सायन, कुर्ला रेल्वे स्थानक तसेच हार्बर मार्गावरील कुर्ला-वडाळा स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. 

मुंबई - मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसला आहे. कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक ही अर्ध्या तासापासून ठप्प झाली आहे. तसेच पावसामुळे कल्याणकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे मध्य रेल्वेवरील सायन, कुर्ला रेल्वे स्थानक तसेच हार्बर मार्गावरील कुर्ला-वडाळा स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (3 ऑगस्ट) हार्बर मार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली आहे. तसेच कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच  कल्याणकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे. यामुळे ठाणे, डोंबिवली यासह अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. ठाणे, मुलुंड रेल्वे स्थानकात पाणी साचले आहे. तर अंबरनाथ, कल्याणमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. 

मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात शुक्रवार सकाळपासूनच पावसाने जोर धरला. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सायन, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकिनाका, अंधेरी, पवई, विद्याविहार, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, पवई, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. या मुसळधार पावसानं सखल भागात पाणी साचलं आहे. 

मुंबईसह ठाणे उपनगरांत आज मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. तसेच तिन्ही मार्गांवरची लोकल सेवाही संथ गतीनं सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यांतल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून पडणाऱ्या पावसाची तीव्रता लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा-कॉलेजला सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनीसुद्धा शक्यतो घराबाहेर पडू नये आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

डोंबिवली एमआयडीसी परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यानं रस्त्यावर, बंगले, सोसायटीचा आवारात पाणी घुसलं आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. उस्मा पेट्रोल पंप ते कल्याण शीळ रोड, सुयोग हॉटेलपर्यंत गुडघाभर पाणी आहे. मुसळधार पावसाने कल्याणच्या सखल भागात पाणी साचलं. कल्याण एपीएमसी मार्केट, शिवाजी महाराज चौक, जोशी बाग, मोहम्मद अली चौक, जरीमरी आदी परिसरात पाणी भरले आहे. तर काही ठिकाणी दुकानात पाणी गेल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. 

 

टॅग्स :मुंबई ट्रेन अपडेटमुंबई मान्सून अपडेटमध्य रेल्वेहार्बर रेल्वे