Mumbai Train Update : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 07:54 IST2019-08-24T07:52:51+5:302019-08-24T07:54:37+5:30
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. परिणामी, रविवारी लोकल फेऱ्या कमी चालविण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांचे सुट्टीच्या दिवशीही हाल होणार आहेत.

Mumbai Train Update : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; प्रवाशांचे हाल
मुंबई : मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. परिणामी, रविवारी लोकल फेऱ्या कमी चालविण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांचे सुट्टीच्या दिवशीही हाल होणार आहेत.
मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे यादरम्यान सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर रविवारी सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत कल्याणहून सीएसएमटी दिशेकडे जाणाºया लोकल कल्याण ते ठाणेदरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील.
सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ पर्यंत सीएसएमटीहून कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल संबंधित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा या स्थानकांवरही थांबतील.
हार्बर मार्गावरील कुर्ला आणि वाशीदरम्यान दोन्ही दिशेकडे सकाळी ११.१० ते ३.४० पर्यंत एकही लोकल धावणार नाही. सकाळी १०.३४ ते दुपारी ३.०८ वाजेपर्यंत सीएसएमटीहून वाशी/ बेलापूर/ पनवेलकडे व सकाळी १०.२१ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पनवेल / बेलापूर / वाशीहून सीएसएमटीकडे लोकल धावणार नाही. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते पनवेल-वाशी, कुर्लादरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.
बोरीवली ते भाईंदर जम्बोब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते भाईंदर या स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येईल. त्यानुसार रविवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बोरीवली ते भाईंदर यादरम्यान दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान दोन्ही दिशेकडील जलद मार्गावरील लोकल विरार / वसई रोड ते बोरीवलीपर्यंत धिम्या मार्गावरून चालविण्यात येतील.