मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील माटुंगा रोड-माहीमदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याचे सांगण्यात येत आहे. ऐन गर्दीच्या वेळी चर्चगेटच्या दिशेनं जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पश्चिम मार्गावरील माटुंगा रोड-माहीमदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. चर्चगेटहून अंधेरीला येणारी धीमी वाहतूक जवळपास 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. तर धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. माटुंगा, प्रभादेवी, लोअर परेल, महालक्षी स्थानकांवर लोकलचा थांबा काही काळासाठी रद्द करण्यात आला आहे. घटनास्थळी रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम सुरु आहे.
दरम्यान, मुंबईची लाइफलाइन असलेल्या रेल्वे मार्गावर तडा गेल्याने विस्कळीत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर काल मध्य रेल्वे मार्गावरील सायन आणि माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला होता. त्यामुळे ऐन कार्यालयीन वेळेत मध्य रेल्वेचा बोऱ्या वाजल्याने प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागता होता.