मुंबई - मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. ऐन गर्दीच्या वेळी मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. मंगळवारी (3 सप्टेंबर) तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. यामुळे ठाणे, डोंबिवली यासह अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. कल्याण आणि कसारा दरम्यान रेल्वे वाहतूक उशिराने सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
हार्बर मार्गावरील वाहतूक 10 मिनिटे उशिराने सुरू आहे. तसेच पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे. कार्यालयांमध्ये जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगरांत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाच्या फटका हा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला बसला आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे.
मुंबई आणि महाराष्ट्रातील बर्याच भागांत गणेश चतुर्थीच्या सणाची सुरुवात पावसाने झाली. पावसामुळे राज्यातील बहुतांश भागातील हवामान सुखद झाले आहे. गेल्या 24 तासांत कोकण आणि गोवा येथे गडगडाटासह चांगला पाऊस झाला असून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि बीड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस पडला आहे. स्कायमेटकडे उपलब्ध असलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत रविवार सकाळी साडेआठपासून हर्णेमध्ये 91 मिमी, डहाणूमध्ये 51 मिमी,वेंगुर्लामध्ये 48 मिमी, ब्रह्मपुरीमध्ये 45 मिमी आणि रत्नागिरीमध्ये 43 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
स्कायमेट हवामान तज्ज्ञांनी पुढील दोन दिवस विदर्भातील काही भागात एक ते दोन मुसळधार सरींसह मध्यम पाऊस आणि मराठवाड्यात मध्यम सरी बरसण्याचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, कोकण आणि गोवा येथे मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहील. या कालावधीत मुंबईत एक किंवा दोन मध्यम सरींची शक्यता आहे, परंतु मुसळधार पावसाची कोणतीही शक्यता नाही.
मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि नाशिकसारख्या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसतील. पुढील दोन ते तीन दिवस हवामान ढगाळ व आरामदायक राहील. या सर्व हवामान परिस्थितीचे श्रेय गुजरातमधील चक्रवाती परिभ्रमणाला दिले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, महाराष्ट्र किनारपट्टीवरील कमकुवत ट्रफ रेषेमुळे मान्सून ची सक्रिय अवस्था आहे. स्कायमेटच्या आकडेवारीनुसार 1 जून ते 1 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातील पावसाची 21% कमतरता वगळता महाराष्ट्रातील अन्य सर्व हवामान विभागांमध्ये पावसाचे आधिक्य आहे.