Join us

‘मुंबई ट्रान्स हार्बर’ने गाठला मैलाचा दगड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 10:20 AM

या महामार्गावर टोल भरण्यासाठी थांबण्याची गरज नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या दुसऱ्या पॅकेजचा ३०वा ओएसडी स्पॅन आयताकृती एच बार्जच्या मदतीने उभारण्यात आल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली. स्पॅन्सची जोडणी ही २६ किमी अंतरावर कारंजा येथे केली असून, या कामामुळे प्रकल्पाच्या कामाला आणखी गती मिळाल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा शिवडी व न्हावा यांना जोडणारा सुमारे २२ किमी लांबीचा ६ पदरी (३. ३ मार्गिका) पूल आहे. या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे १६.५ किमी असून, जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे ५.५ किमी इतकी आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम ९० टक्के काम पूर्ण झाले असून, यावर्षी नोव्हेंबरपासून हा सागरी मार्ग खुला होईल. मुंबई ते अलिबाग हे अंतर या सागरी महामार्गामुळे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. बांधकामातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून त्याचे काम केले असून, या महामार्गावर टोल भरण्यासाठी थांबण्याची गरज नाही.

 संपूर्ण प्रकल्पांतर्गत समुद्रात उभारण्यात येणाऱ्या एकूण ७० ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक स्पॅनपैकी बऱ्याच स्पॅनची उभारणी पूर्ण झाली आहे.  मुख्य पुलाची रचना ही ६० मीटर लांबीच्या स्पॅनची असून, मुख्यतः ते सेगमेंटल बॉक्स गर्डर व कॉंक्रिट डेक आहेत.  मुंबई पाेरबंदर प्रकल्पाचे एक प्रमुख वैशिष्ट्य असलेला हा सागरी क्षेत्रातील नॅव्हिगेशन भागातील स्टील डेक आहे. ज्याला तांत्रिकदृष्ट्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक असे म्हणतात.  समुद्रातील जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मोठ्या लांबीचे हे स्पॅन समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून सुमारे २५ मीटर उंच बांधण्यात येत आहेत. त्यामुळे हा स्पॅन नेव्हिगेशनल स्पॅन म्हणून ओळखला जातो.

टॅग्स :मुंबई