मुंबई : मुंबई शहर परिवहन प्रकल्प- टप्पा ३ (एमयूटीपी-३) हा ११ हजार ४४० कोटी रुपयांचा प्रकल्प निर्धारित मुदतीत पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या ई-आॅफिसचा प्रारंभ मुख्यमंत्री फडणवीस व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत झाला. जयगड पोर्ट जोडण्याबाबत जयगड पोर्ट लि. आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांच्यात सवलत करारावर तसेच मध्य रेल्वे व राज्य सरकार यांच्यातील सामंजस्य करारावर या वेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.या वेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव गौतम चटर्जी, जेएसडब्लूचे प्रमुख सज्जन जिंदाल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सुद आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील मागास भागास रेल्वेमार्गाने जोडण्यात आल्यास त्या भागाचा विकास होण्यास मदत होते. यासाठी हा प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील अपूर्ण असलेले रेल्वेमार्ग लवकर पूर्ण करणे आणि प्रलंबित असलेले रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात येतील. या प्रकल्पामुळे विविध बंदरे, रेल्वे आणि मुख्य रस्त्यांशी जोडण्यात येणार आहे. तसेच बंदरांची क्षमता वाढविण्यावरही भर देण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले की, राज्य आणि केंद्र सरकार एकत्र येऊन पुढची दिशा ठरविण्यासाठी हे करार महत्त्वाचे आहेत. मुंबईत देशभरातून प्रवासी रेल्वेने येतात. त्याचबरोबर ७५ लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात, त्यामुळे रेल्वेचा विकास देशाचा विकास आहे. तर डिजिटल इंडिया होण्यासाठी ई-आॅफिसचा प्रारंभ महत्त्वपूर्ण आहे. परिवहनमंत्री रावते यांनी मुंबई व महाराष्ट्राकरिता असलेल्या रेल्वे प्रकल्पांची तसेच प्रलंबित प्रकल्पांची माहिती दिली. कोकण किनारपट्टीचा विकास करण्यासाठी आणि राज्यातील उद्योग जगताला आयात-निर्यातीसाठी उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जयगड बंदर कोकण रेल्वेला जोडण्याच्या प्रकल्पाकरिता सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. कोकण रेल्वे महामंडळाने जयगड बंदर ते डिगणी (संगमेश्वर) हा जोड रेल्वेमार्ग तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. जयगड ते डिंगणी हा ३३.७ कि.मी.चा नवीन रेल्वे मार्ग असेल. या प्रस्तावित एकेरी मार्गाचा खर्च ७७१ कोटी रुपये आहे. हा प्रकल्प कोकण रेल्वे, मेरीटाईम बोर्ड आणि जयगड पोर्ट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. सुमारे ३० महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)एमयूटीपी-३मधील कामे> पश्चिम रेल्वेमार्गावरील विरार- डहाणू १२६ कि.मी.-(२ हजार ५५५ कोटी रु पये), पनवेल-कर्जत ही नवीन उपनगरीय मार्गीका जोडण्यात येणार असून, त्याची लांबी ५६ कि.मी. असणार आहे. या प्रकल्पाची किंमत २ हजार २४ कोटी रु पये आहे. त्याचबरोबर ऐरोली आणि मध्य रेल्वेमार्गावरील कळवा यादरम्यान ८ कि.मी. नवीन उपनगरीय मार्गीका जोडण्यात येणार आहे. या प्रकलपाची किंमत ४२८ कोटी रुपये आहे. > रोलींग स्टॉकसाठी २ हजार ८९९ कोटी रु पये, तर पश्चिम रेल्वे (११), मध्य रेल्वे (८) आणि हार्बर रेल्वे (२) अशा तिन्ही रेल्वे मार्गांवरील २१ स्थानकांच्या पुनर्विकासासाठी १ हजार ९५० कोटी रु पये खर्च येणार आहे. मध्य आणि पश्चिम मार्गावरील ट्रेसपास कंट्रोलसाठी ५२० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
मुंबई परिवहन प्रकल्प मुदतीत पूर्ण करणार
By admin | Published: June 29, 2015 3:26 AM