२०६० सालीही मुंबई तहानलेली!

By Admin | Published: March 27, 2015 01:32 AM2015-03-27T01:32:00+5:302015-03-27T01:32:00+5:30

मुंबईत सध्या दररोज ८५४ दशलक्ष लीटर पाण्याचा तुटवडा असून २०६० साली मुंबईची पाण्याची गरज ७००० दशलक्ष लीटर असेल

Mumbai trembled in 2060! | २०६० सालीही मुंबई तहानलेली!

२०६० सालीही मुंबई तहानलेली!

googlenewsNext

मुंबई : मुंबईत सध्या दररोज ८५४ दशलक्ष लीटर पाण्याचा तुटवडा असून २०६० साली मुंबईची पाण्याची गरज ७००० दशलक्ष लीटर असेल व पाण्याची तूट २०२० दशलक्ष लीटर इतकी असेल हे भीषण वास्तव गुरुवारी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने केलेल्या सादरीकरणातून स्पष्ट झाले.
मुंबईची पाण्याची मागणी सध्या ४५२९ दशलक्ष लीटर असून पुरवठा ३६७५ दशलक्ष लीटर आहे. २०६० साली पाण्याची गरज ७००० दशलक्ष लीटर होईल तेव्हा मध्य वैतरणा, भातसा व गारगाई प्रकल्पातून ४९८० दशलक्ष लीटर एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जाईल. परिणामी २०२० दशलक्ष लीटर पाण्याचा तुटवडा असेल. मुंबईवरील हे जलसंकट टाळण्याकरिता केंद्र सरकारने निश्चित केलेल्या नदीजोड प्रकल्पात दमणगंगा-पिंजाळ प्रकल्पाद्वारे १५८६ दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होऊ शकते, असा सरकारचा दावा आहे. याखेरीज पिंजाळमधून ८६५ दशलक्ष लीटर पाणी मुंबईला देण्याची योजना आहे.
विधान परिषदेत याच विषयावरील लक्षवेधीवर उत्तर देताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आमदारांपुढे सादरीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी सादरीकरण करण्यात आले.
नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी (एन.डब्ल्यू.डी.ए.)ने मुंबईला २०.४५ अब्ज घनफूट इतकेच पाणी देऊ केले असून महाराष्ट्र शासन ३०.३१ अब्ज घनफूट पाण्याची मागणी करीत आहे. महाराष्ट्राची मागणी व एन.डब्ल्यू.डी.ए.ने देऊ केलेले पाणी यामध्ये ९.८६ अब्ज घनफूट पाण्याची तफावत आहे. महाराष्ट्राची मागणी मान्य झाली आणि मुंबईला दुथडी भरून पाणी मिळाले तर उर्ध्व वैतरणा धरणातून ९.८६ अब्ज घनफूट पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचे गाजर उत्तर महाराष्ट्राला दाखवण्यात आले आहे. दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्पाचा अंदाजित खर्च २७४७ कोटी रुपये आहे. या प्रकल्पाचा डीपीआर २०१४ मध्ये झालेला असून आता अन्य तपशील ठरवणे बाकी आहे.
मुंबई हीच सरकारची प्राथमिकता राहिली असून मुंबईची गरज भागवल्यावर गोदावरी खोऱ्यात पाणी सोडण्याच्या कल्पनेला उत्तर महाराष्ट्रातील आमदारांनी विरोध केला. राज्याची सध्याची आर्थिक स्थिती पाहता हा प्रकल्प पूर्णत्वाला जाईपर्यंत त्याचा खर्च किती असेल
व दमणगंगा-पिंजाळ प्रकल्प पूर्ण झाला नाही तर २०६० मधील मुंबईतील पाण्याची २०२० दशलक्ष लीटर्सची तूट कशी भरून काढली जाणार याबाबतचे चित्र धूसर
आहे. (विशेष प्रतिनिधी)

४५२९ दशलक्ष लीटर पाण्याची सध्या मुंबईकरांची मागणी आहे.
२०६० साली पाण्याची गरज ७००० दशलक्ष लीटर होईल.
२०२० दशलक्ष लीटर पाण्याचा तुटवडा असेल.
१५८६ दशलक्ष लीटर पाणी दमणगंगा-पिंजाळ प्रकल्पाद्वारे उपलब्ध होऊ शकते.
८६५ दशलक्ष लीटर पाणी पिंजाळमधून मुंबईला देण्याची योजना आहे.

Web Title: Mumbai trembled in 2060!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.