अनभिज्ञ राजकारण्यांमुळे मुंबई तुंबली, नगर नियोजनाच्या अभ्यासक सुलक्षणा महाजन यांचं रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2017 02:12 PM2017-08-30T14:12:29+5:302017-10-10T11:41:53+5:30

उद्याच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून जर लोकानुनयी राजकारणाने निर्णय होत राहिले तर पुढच्या पावसाची अशीच वाट पाहण्यापलिकडे आपल्या हातात काहीच नाही हे लक्षात घ्या ! 

Mumbai Tumbli, city planning scholar Sulakshana Mahajan's unhappy politics | अनभिज्ञ राजकारण्यांमुळे मुंबई तुंबली, नगर नियोजनाच्या अभ्यासक सुलक्षणा महाजन यांचं रोखठोक मत

अनभिज्ञ राजकारण्यांमुळे मुंबई तुंबली, नगर नियोजनाच्या अभ्यासक सुलक्षणा महाजन यांचं रोखठोक मत

Next

मुंबई, दि. 30 - कालच्या व १२ वर्षांच्या पुरस्थितीत दक्षिण मुंबई तुलनेत व्यवस्थित राहीली (जो तडाखा बसला तो उपनगरी गाड्या बंद झाल्याने लोक खोळंबले म्हणून पण दक्षिण मुंबईचे जे रहिवासी घरात होते ते सुरक्षित होते) याचे कारण दक्षिण मुंबईचे थोडेतरी नियोजन करण्यात आले होते. मात्र शीव, माटुंगाच्या पुढे ठाण्यापर्यंत जी मुंबई वाढली त्याचे कोणतेही नियोजन व्यवस्थित झालेले नाही. मुंबईचे कंटूर मँपिंग केले नसल्याने कोणीही रस्त्यांच्या , घरे बांधण्यासाठी जमिनीच्या पातळीचा विचार केला नाही, त्यामुळे हे पाणी साचण्याचे व रस्ते तुंबण्याचे प्रकार घडतात.नागरी नियोजनातील भयानक चुका, राजकारणी लोकांची अल्पदृष्टी असे तडाखे देत राहणार. मुंबईला खरी गरज आहे ती पुढ्चा एक, दोन वर्षांची काळजी करणार्या राजकारण्यांऐवजी पुढच्या दोनशे वर्षांची काळजी करणार्या लोकांची. लोकांना घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून द्यावे लागेल त्यासाठी खर्चही केला पाहिजे.

उद्याच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून जर लोकानुनयी राजकारणाने निर्णय होत राहिले तर पुढच्या पावसाची अशीच वाट पाहण्यापलिकडे आपल्या हातात काहीच नाही हे लक्षात घ्या ! 

मुंबई-ठाणे ही शहरे मंगळवारी पडलेल्या पावसाने कोलमडून पडली. अवघ्या बारा तासातं पडलेला प्रचंड पाऊस, भरतीची गाठून आलेली वेळ हे जरी त्याचे प्रमुख कारण असले, तरी शहरांच्या नियोजनाकडे पाहण्याचा राजकीय दृष्टिकोन, त्याबाबत निर्णय घेणारे अनभिज्ञ राजकारणी आणि शहराच्या गरजांपेक्षा राजकीय गरजेपोटी हाती घेतलेले प्रकल्प यांचा हा परिपाक आहे.

मुंबईचा भूगोल ठाण्यापेक्षा वेगळा आहे. मुंबई हे भराव घालून तयार केलेले शहर आहे. पण मंगळवारच्या पावसात तुलनेने दक्षिण मुंबईला कमी फटका बसला. कुलाबा ते दादरपर्यंतचा भाग तुलनेने वाचला. याचे प्रमुख कारण म्हणजे हा भराव घालताना केलेला शास्त्रशुद्ध अभ्यास. दादरच्या पुढे-उपनगरांचा मात्र अभ्यास न करता आपण मुंबई वसवली. त्याचा हा परिणाम आहे. तेथे पाणी तुंबले. लोक ठिकठिकाणी अडकून पडले. वाहतूक कोलमडली. आपल्याकडे शहरांच्या  रचनेत अभ्यासाचा असलेला अभाव, तज्ज्ञांचा सल्ला न घेता कशीही शहरे विस्तारत नेल्याचा हा परिणाम आहे. शहरांच्या नियोजनाचे निर्णय आजही राजकारणी घेतात. त्यातही अनभिज्ञ राजकारण्यांच्या हाती हे नियोजन गेल्याचा हा परिणाम आहे. 

समुद्राकाठी असलेले शहर म्हणून मुंबई हा काही जगातला अपवाद नाही. अमेरिका, युरोपातील देश, चीन, व्हिएतनाम असे अनेक देश आहेतच की. पण त्यांनी तेथील शहरे वसवताना भौगोलिक स्थितीचा, त्या त्या परिसराच्या सामाजिक गरजांचा अभ्यास केला. शहराचे सर्व निर्णय राजकारण्यांनी घेण्याची परंपरा तेथे कालबाह्य झाली आहे. त्यांच्या मतांच विचार तिकडे होत नाही. त्यामुळे आपल्यासारखी परिस्थिती तेथे उद्भवलेली पाहायला मिळत नाही. 

शहराच्या नियोजनात कायम पुढच्या 100 वर्षांचा विचार व्हायला हवा. त्यात तात्कालिक गरजांनुसार बदल, सुधारणा व्हायला हव्यात. पण ते मूळ नियोजन कायम ठेवूनच. आपल्याकडे तेच होत नाही. मर्जीनुसार निर्णय घेतले जातात.

हल्लीहल्लीच मुंबईची चंडीगढशी तुलना केलेली वाचली आणि नियोजन करून बांधलेले त्यासारखे शहर पाण्याखाली जाते तर मग मुंबईला का दोष दिला जातो, असा प्रश्न उपस्थित केला गेला. मूळात चंडीगढ हे नगरनियोजनाचे आदर्श मॉडेल नाही. एका आर्किटेक्टच्या नजरेतून दिसलेले ते शहर आहे. ते मॉडेल नगर नियोजनाच्या दृष्टीने अपुरे आहे. लोकांच्या गरजांचा त्यात विचार झालेला नाही. त्यामुळे त्या शहराशी तुलना करणे अयोग्य आहे.

तुलना करायचीच असेल तर नवी मुंबईशी करायला हवी. मंगळवारच्या पावसात नवी मुंबई तुंबली, तिथे गुडघाभर पाणी साठले असे पाहायला मिळालेले नाही. याचे कारण पावसाचे-भरतीचे शहरात आलेले पाणी साठवून ठेवण्यासाठी तेथे जी होल्डिंग पॉण्ड उभारली आहेत, याला त्याचे श्रेय द्यावे लागेल. 1970 साली नेदरलँण्डची टीम आली आणि तिने केलेल्या सूचनांनुसार ही पॉण्ड उभारण्यात आली. त्याचा खर्चही त्यावेळी बराच होता. पण शहराच्या गरजेसाठी तो केला गेला, त्याचा हा परिणाम आहे. तो विचार मुंबई-ठाण्यात व्हायला हवा.

जसे आपल्याकडे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी फ्लायओव्हर हा चुकीचा पर्याय निवडला गेला आणि त्यातून वाहतुकीचे नियोजनच चुकले, तसे मुंबईच्या उपनगरांबाबत आणि ठाण्याबाबत झाले आहे. तज्ज्ञांचा सल्ला न घेता चुकीचे नियोजन अंमलात आणले जात आहे.

शहरांच्या भूगोलाचा अभ्यास न करता राजकीय गरज म्हणून आखलेले-प्रत्यक्षात आणलेले प्रकल्प याला कारणीभूत आहेत. शहराची, तेथील नागरिकांची गरज, व्यवस्थेची गरज, शहरांतर्गत व्यवहारांची सोय न पाहता प्रत्यक्षात आणलेले प्रकल्प आणि तेथील नैसर्गिक व्यवस्थेचा विचार न करता कशीही शहरे वाढू दिल्याचा हा परिणाम आहे. आपल्याकडे कधी सुसंगत यंत्रणाच उभारली गेली नाही. त्याचा फटका असा बसतो.

ठाण्यातही आपण नागरिक म्हणून प्रो अॅक्टिव्ह राहिलो नाही, तर हेही शहर तुंबत जाईल. मी जो अभ्यास केला, त्यानुसार, ठाणे हे मूळचे तळ्यांचे शहर होते. जेव्हा तेथे भातशेती केली जात होती, आताासारखे शहर वाढलेले नव्हते, तेव्हापासून शहरात 60-65 तळी होती. खूप पाऊस पडला की डोंगरउतारावरून वाहात येणारे पाणी, पावसाचे पाणी साठवून ठेवण्याचे आणि नंतर पाऊस ओसरल्यावर त्या पाण्याचा निचरा करण्याचे काम ही तळी करत होती. त्यातून भातशेतीचे संरक्षण होत असे. पण आताच्या नागरीकरणात कोणताही विचार न करता यातील तळी बुजवली गेली. आता कशीबशी 10-12 तळी उरली आहेत. त्यांचीही निगा राखली जात नाही. त्याचा फटका ठाण्याला बसतो आणि ठिकठिकाणी पाणी  तुंबते. त्याचा निचरा होत नाही. ते पाणी नाल्यांत जाते. एवढे पाणी सामावून, वाहून नेण्यची नाल्यांची क्षमता नाही. त्यामुळे पाणी तुंबत राहते आणि ठाणे शहरही मुंबईसारखे तुंबलेले पाहण्याची वेळ येते. होल्डिंग पॉण्ड म्हणून असलेला या तळ्यांचा विचार अजूनही केला, त्यांची स्वच्छता केली, बुजवलेली तळी मोकळी केली तर ठाणे शहरात सुधारणा होऊ शकेल. पण त्यासाठीही राजकारण्यांच्या सोयीने नव्हे, तर शहराच्या गरजेचा अभ्यास करून ठाण्यात नवे प्रकल्प आखले, ते प्रत्यक्षात आणले तरच ठाण्यातील हे प्रश्न सुटू शकतील. 

आता सध्या अमेरिकेत टेक्सासमध्ये चक्रीवादळआले आहे मात्र ते येण्यापुर्वीच जनतेला त्याची माहिती व सुरक्षेचे उपाय समजावून दिले होते त्यामुळे मोठी हानी टळली. हे अमेरिकेसारख्या देशांमध्ये नियमित होत असते पण सुरक्षेचे उपायही तितक्याच चोखपणे बजावले जातात. लोकांना वेळीच सावध करुन प्रभावक्षेत्रातून त्यांची आधीच सुटका करण्यात येत असते. अशी योजना किंवा तशी दृष्टी आपल्याकडे आता यायला हवी. आपत्ती आल्यानंतर हातपाय हलवण्यापेक्षा आधीच तयारी केली तर चांगलं होईल.
 

Web Title: Mumbai Tumbli, city planning scholar Sulakshana Mahajan's unhappy politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.