Join us

मुंबई झाली गारेगार, पारा 16 अंशांवर; दिवसाही आल्हाददायक वातावरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 7:51 AM

अरबी समुद्रासह लगतच्या परिसरातील हवामान बदलामुळे मुंबई प्रदूषणाने वेढले होती. शिवाय कमाल तापमानाचा पाराही चढला होता.

मुंबई : उत्तर-पश्चिम भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्यामुळे मुंबईसह राज्य गारठले असून, मुंबईचे किमान तापमान मंगळवारी १६.२ नोंदविण्यात आले आहे. राज्यातील बहुतांशी शहरांचे किमान तापमानही १५ अंशाखाली घसरले असून, आणखी दोन दिवस थंडी कायम राहणार असल्याने नागरिकांना गारेगार वातावरणाचा आनंद लुटता येणार आहे.

अरबी समुद्रासह लगतच्या परिसरातील हवामान बदलामुळे मुंबई प्रदूषणाने वेढले होती. शिवाय कमाल तापमानाचा पाराही चढला होता. त्यामुळे ऐन हिवाळ्यात मुंबईकरांना ‘ताप’दायक वातावरणाला सामोरे जावे लागले होते. मात्र, आता हे वातावरण निवळले असून, उत्तर-पश्चिम भारतातून दक्षिणेकडे गार वारे वाहू लागले आहे. त्यामुळे किमान तापमानात घसरण झाली आहे.

चालू हंगामातील मुंबईच्या किमान तापमानाचा आतापर्यंतचा हा नीचांक आहे. यापूर्वी किमान तापमानाची नोंद १७.५ अंश सेल्सिअस झाली होती.मुंबईच्या कमाल तापमानातही घट नोंदविण्यात येत आहे. कमाल तापमानाचा पारा २९ ते ३० अंश नोंदविण्यात येत आहे.मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी आणि रात्री गार वारे वाहत असून, दमट वातावरणही काहीसे आल्हाददायक झाले आहे. त्यामुळे उकाड्यापासून सुटका झाली आहे.

शहरांचे किमान तापमान    (अंश सेल्सिअसमध्ये)छ. संभाजी नगर    ९.२जळगाव    ९.४अहमदनगर    ९.६नाशिक    ९.८मालेगाव    ११.४सातारा    १२.४परभणी    १३.५नांदेड    १४सोलापूर    १४.५अलिबाग    १४.६महाबळेश्वर    १४.७डहाणू    १५.५सांगली    १५.८मुंबई    १६.२रत्नागिरी    १६.३कोल्हापूर    १६.९धाराशिव    १७

उत्तर -पश्चिम भारतातील शीतलहरीचा मुंबईवर पुढील दोन दिवस परिणाम राहील. १८ जानेवारीपर्यंत मुंबईकरांना गारेगार वातावरण अनुभवास येईल. शिवाय हवामानात बदल झाल्याने मुंबईतल्या प्रदूषणातही घट झाली आहे.    - राजेश कपाडिया,     वेगरिज ऑफ दी वेदर

१७ ते २१ जानेवारीपर्यंतच्या पुढील ५ दिवसांत मुंबईसह कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान १४, तर दुपारचे कमाल तापमान ३० अंशांदरम्यान असेल. उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान १२, तर दुपारचे कमाल तापमान २८ असेल.

टॅग्स :हवामान