विलेपार्ले पश्चिमेला गावठाण परिसरात असलेल्या ब्रेझ रोड येथे रविवारी एका दुमजली घराची बाल्कनी कोसळून त्यात एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला. त्यात अन्य तिघे जखमी झाले असून त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विद्याविहार- घाटकोपर येथे राजावाडी रुग्णालयानजीक असलेल्या राजावाडी कॉलनी- चित्तरंजननगर येथील एका इमारतीचा भाग कोसळला. त्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकले आहेत, तर तेथील चौघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
मृत दाम्पत्याचे नातेवाईक असलेले ज्युड डिसोजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रिशिला मिस्किटा (६५) आणि रॉबी मिस्किटा (७०) हे त्यांचा मुलगा झेनो (२२) याच्यासोबत या ठिकाणी राहतात. हे तिघे जण वरात बघत गॅलरीत उभे होते. त्याच सुमारास बाल्कनीचा भाग अचानक कोसळला. त्यात रॉबी हे थेट खाली पडले तर प्रिशीला यांच्यावर ढिगारा कोसळला, त्यांचा मुलगा झेनो हा पहिल्या मजल्यावर अडकला आणि गंभीररीत्या जखमी झाला. तर, सुमित्रादेवी (५८) आणि अजून एक जण यात जखमी झाला. जखमींना स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात हलवले. कूपर रुग्णालयात मिस्किटा पती-पत्नीला मृत घोषित केले.
बचावले बँडवालेरविवारी आमचा सण होता. यात नववधू-वरांना वाजत गाजत जवळच्या विहिरीकडे नेले जाते.. मिस्किटा यांच्या घराजवळून बैंड वादक निघाले होते. स्लॅब कोसळण्यापूर्वी जवळपास दहा ते पंधरा जण या घराखाली उभे होते. त्यामुळे अवघ्या काही सेकंदाआधी हा प्रकार घडला असता तर मोठा अनर्थच घडला असता, असे समाजसेवक गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले.
राजावाडी कॉलनीत ढिगाऱ्याखाली दोघे अडकलेविद्याविहार येथील राजावाडी कॉलनीत एका इमारतीचा काही भाग रविवारी सकाळी कोसळला. ही इमारत ग्राउंड- प्लस-तीन मजली होती आणि जो भाग कोसळला तो तिसरा मजला होता. पहिल्या मजल्यावर असलेल्या एका तरुणाची सुटका करण्यात यश मिळाले. मात्र, त्याचे वडील आणि आजी हे आतच अडकून पडले. ज्यांचा शोध उशिरा रात्रीपर्यंत सुरू होता. आम्ही इमारतीत पोकळी बनवून पीडितांचे लोकेशन कॅमेरा वापरून शोधले. मात्र, विभाजन भितीमुळे अडकलेल्या व्यक्तींना शोधण्यात अडथळे येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.