धक्कादायक! मुंबईत नाकाबंदीवर असलेल्या दोन पोलिसांवर तरुणाचा कोयत्यानं हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 01:59 PM2020-05-09T13:59:12+5:302020-05-09T14:27:50+5:30
मरीन ड्राईव्ह परिसरात दोन पोलिसांवर हल्ला; तरुणाला अटक
मुंबई: कोरोना संकटाच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना वाढतच आहेत. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात दोन पोलिसांवर एका तरुणानं हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्लखोर तरुणाला अटक करण्यात आली असून जखमी पोलिसांवर उपचार सुरू आहेत. काल रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.
काल रात्री मरिन ड्राईव्ह परिसरात प्रदीप नायर नावाच्या तरुणानं पोलिसांवर हल्ला केला. रात्री दीड वाजता ही घटना घडली. हा तरुण ब्रीच कँडी जवळील सिल्व्हर ओक इस्टेट परिसरात राहत असल्याची माहिती मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृत्यूंजय हिरेमठ यांनी दिली. प्रदीप नायरनं नाकाबंदीवर असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कोयत्यानं हल्ला केला. या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला आणि हाताला दुखापत झाली. त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राणसुखलाल मफतलाल हिंदू स्विमिंग बाथ अँड बोट क्लबजवळ काल रात्री काही पोलीस कर्मचारी नाकाबंदीचं कर्तव्य बजावत होते. त्यावेळी एक तरुण हातात कोयता घेऊन येत असल्याचं त्यांनी पाहिलं. पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो पळू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. त्यावेळी त्यानं पोलिसांवर कोयत्यानं हल्ला केला, अशी माहिती हिरेमठ यांनी दिली.
अटक करण्यात आलेला तरुण वास्तुविशारद असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याच्यावर कलम ३०७ सह भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हल्लेखोर तरुण कोयता घेऊन बाहेर का पडला? याचा तपास होईल. पोलिसांवरील हल्ला सहन केला जाणार नाही. मुंबई पोलीस आयुक्तांशी या प्रकरणी तातडीनं बातचीत करणार असल्याचं गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितलं आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील त्यांनी दिला.