Mumbai: मुंबई टू चेन्नई निघालेली दुचाकी लंपास! मुळ कागदपत्रे, ट्रान्सपोर्टेशनसाठीची रक्कमही गमावली
By गौरी टेंबकर | Published: August 21, 2023 06:14 PM2023-08-21T18:14:46+5:302023-08-21T18:15:13+5:30
Crime News: कामानिमित्त मुंबईत नावावर असलेली दुचाकी ओरिजनल कागदपत्रांसह चेन्नईला मागवण्याच्या नादात ती गमावण्याची वेळ एका तरुणावर आली. तसेच त्याच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी दिलेले पैसेही लंपास करण्यात आले.
- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई - कामानिमित्त मुंबईत नावावर असलेली दुचाकी ओरिजनल कागदपत्रांसह चेन्नईला मागवण्याच्या नादात ती गमावण्याची वेळ एका तरुणावर आली. तसेच त्याच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी दिलेले पैसेही लंपास करण्यात आले. हा प्रकार दहिसर परिसरात घडला असून याप्रकरणी तरुणाचा भाऊ हितेश पालीवाल (३२) यांनी दहिसर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली आहे.
तक्रारदार पालीवाल यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी त्यांचा चेन्नई नोकरी करणारा त्यांचा भाऊ दिवेश (२९) याला त्याच्या नावावर असलेली मोटरसायकल ही कामासाठी चेन्नईमध्ये हवी होती. त्यामुळे त्याने चेन्नई मधून ऑनलाइन सर्च केल्यावर त्याला एक मोबाईल क्रमांक प्राप्त झाला. त्याने त्यावर संपर्क साधल्यानंतर स्वतःचे नाव मंदिपकुमार सांगणाऱ्या व्यक्तीने तो उचलत हा क्रमांक गती ट्रान्सपोर्ट कंपनीचा असल्याचे दिवेशला सांगितले. तेव्हा दिवेशने त्याला त्याची मोटरसायकल मुंबईवरून चेन्नईला ट्रान्सपोर्ट करायची आहे अशी माहिती दिली. तेव्हा मंदिप कुमारने त्यासाठी १० हजार रुपये आणि सोबत गाडीची मूळ कागदपत्रे द्यावे लागतील असे सांगत सुमित राव नावाच्या इसमाचा मोबाईल क्रमांक दिवेशला दिला. त्यावर त्याने एकूण १० हजार ३४२ रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. तसेच त्याच्या कंपनीकडून एक मुलगा गाडी घ्यायला येईल त्याला ती द्या असेही म्हणाला. तेव्हा १५ ऑगस्ट रोजी ११.४५ वाजताच्या सुमारास दिवेशने त्याच्या वडिलांना फोन करत प्रदीप सिंग नावाचा व्यक्ती दुचाकी घेण्यासाठी आला असून त्याला ती देण्यास सांगितले.
वडिलांनी मुलाच्या सांगण्याप्रमाणे गाडी आणि कागदपत्रे सिंगला दिली. मंदिपकुमारच्या सांगण्यानुसार गाडी १९ ऑगस्ट रोजी चेन्नईला पोहोचणार होती. मात्र ती न पोहोचल्याने दिवेश याने गती ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कस्टमर केअर क्रमांकावर कॉल करून माहिती घेतली. ज्यात आम्ही दुचाकी ट्रान्सपोर्ट करत नाही असे सांगण्यात आले त्यामुळे त्याने मंदिपकुमार याला फोन केला तर त्याने फोन उचलला नाही. दिवेशच्या वडिलांनी गाडी घ्यायला आलेल्या सिंग याला फोन केल्यावर ती गाडी पाठवून दिल्याचे सांगितले आणि त्यानंतर त्यांनी फोन उचलणे बंद केले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि पालीवाल यांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली.