Join us

पावसाळ्यात मुंबई ‘अंडर कंट्रोल’, निवडणूक वर्षामुळे यंत्रणा सतर्क; मेट्रो, मोनो रेल प्रशासनही अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 9:44 AM

दरवर्षी पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्यत्वे मुंबई पालिकेची यंत्रणा सज्ज असते.

मुंबई : लोकसभेपाठोपाठ विधानसभा आणि महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडून नागरिक व विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागू नये, यासाठी यंदा सर्वच सरकारी यंत्रणांनी विशेष खबरदारी घेत आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्याकरिता अतिरिक्त मनुष्यबळही तैनात केले आहे.

दरवर्षी पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्यत्वे मुंबई पालिकेची यंत्रणा सज्ज असते. मुंबईतील अन्य प्राधिकरणांकडून परिस्थिती हाताळण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारला जातो, मात्र तो जुजबी स्वरूपाच्या तयारीनिशी कार्यान्वित केला जातो. मात्र यंदाचे निवडणुकीचे वर्ष आहे. विधानसभा आणि पालिका निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्यासह विविध आपत्तींमुळे राज्य सरकारला टीकेचे धनी व्हावे लागू नये, यासाठी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यंदा पावसाळ्यात उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी विविध मेट्रो प्रकल्पस्थळी १९ आपत्कालीन प्रतिसाद दलाद्वारे सुमारे ३०० पेक्षा अधिक अभियंते आणि कामगार तैनात केले आहेत. आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४ तास सुरू असणार आहे. प्रत्येक मेट्रो प्रकल्पस्थळी एक अभियंता आणि १० मजुरांची टीम कार्यरत असेल. १८ आपत्कालीन केंद्र, १८ देखभाल वाहने आणि १७ रुग्णवाहिकाही २४ तास उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर मेट्रो प्रकल्पांजवळील भागात पाण्याचा निचरा करण्यासाठी १३१ पाणी उपसा पंप उपलब्ध केले आहेत, अशी माहिती ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी दिली. 

दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानेही (एमएसआरडीसी) त्यांच्या अखत्यारीतील पुलांच्या हद्दीतील कामे करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यासाठी २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. तसेच ‘एमएमएमओसीएल’ने मेट्रोचे कार्यान्वयन अचूक करण्यासाठी हवेचा वेग तपासण्याचे १० ॲनिमोमीटर मेट्रो मार्ग ‘२ अ’ आणि ‘७’च्या १० स्थानकांवर बसविले आहेत. 

मेट्रो, मोनो रेल प्रशासनाचीही दक्षता-

मुंबई मेट्रो आणि मोनो रेलच्या अविरत सेवेसाठी अत्याधुनिक आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पूरस्थितीमुळे रस्ते वाहतूक ठप्प झाल्यास अतिरिक्त प्रवाशांची वाहतूक करण्याच्या दृष्टीने मेट्रो आणि मोनोच्या सेवांच्या फेऱ्या वाढवण्यावर भर असणार आहे.

... या क्रमांकावर साधा संपर्क

मेट्रो आणि मोनो रेलचे  प्रवासी आपत्कालीन परिस्थितीत १८००८८९०५०५, १८००८८९०८०८, ८४५२९०५४३४ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महामुंबई मेट्रोने प्रत्येक मेट्रो स्थानकावर ६४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे प्लॅटफॉर्म, स्थानकाखालील रस्ता आदी ठिकाणी ऑपरेशन कंट्रोल सेंटर आणि सुरक्षा नियंत्रण कक्षाद्वारे २४ तास पाळत ठेवण्यात येणार आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :मुंबईनगर पालिकामोसमी पाऊसएमएमआरडीएराज्य रस्ते विकास महामंडळ