रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५च्या सर्व विद्याशाखेच्या प्रवेशाच्या अंतिम तारखा जाहीर केल्या आहेत. महाविद्यालयाने दिलेल्या मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्यांना दंड लावण्यात येणार आहे.
काही महाविद्यालये वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करत नाहीत. तसेच विद्यापीठाला दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज सादर करीत नसल्याने या विद्यार्थ्याची विद्यापीठात नोंदणी होत नाही किंवा नोंदणी करतात पण पुढील प्रक्रिया केली नसल्याने विद्यार्थ्याच्या परीक्षेचे प्रवेशपत्र ( हॉल तिकीट) तयार होत नाही किंवा प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने हे निकाल राखीव ठेवावे लागतात. या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेताना अडचणी निर्माण होत आहेत. असे होऊ नये म्हणून प्रवेशाची अंतिम मुदत निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रवेश, नावनोंदणी,पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र विभागाचे उपकुलसचिव अशोक घुले यांनी सांगितले.
प्रवेशाचे वेळापत्रक
एमकेसीएल / ई-समर्थ प्रणालीत नोंद करण्याची शेवटची तारीख पुढीलप्रमाणे असेल.पदवी अभ्यासक्रम(कला, वाणिज्य, विज्ञान शाखानिहाय नियमित व व्यावसायिक अभ्यासक्रम)
१. प्रथम वर्ष ( १२ वी निकालानंतर ) : ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत
२. द्वितीय वर्ष : ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत
३. तृतीय वर्ष : ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत
पदव्युत्तर अभ्यासक्रम ( एमए, एमकॉम, एमएसस्सी )
१. प्रथम वर्ष सत्र १ व २: ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत
२. द्वितीय वर्ष सत्र ३ व ४ : ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत
व्यावसायिक अभ्यासक्रम (अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र), विधी, शिक्षणशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रम)
१. प्रथम वर्ष (सीईटी सेलच्या प्रवेश प्रक्रियेनंतर)
२. द्वितीय वर्ष : ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत
३. तृतीय वर्ष : ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत
४. चतुर्थ वर्ष : ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत
५. पाचवे वर्ष : ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत
अंतिम तारखेनंतर दंड
महाविद्यालयांनी प्रत्येक दिवसाची प्रवेश प्रक्रिया त्याच दिवशी पूर्ण करून एमकेसीएल / ई-समर्थ या प्रणालीमध्ये नोंद करावी. या तारखेनंतर प्रवेश करता येणार नाही. संबधित प्रणालीमध्ये शेवटच्या तारखेपर्यंत नोंदणी केल्यास दंड आकारण्यात येईल.
दंडाची रक्कम
अंतिम तारखेनंतर ३० दिवसापर्यंत दंड - पाच हजार
३० दिवसानंतर - पाच हजार आणि प्रती विद्यार्थी, प्रतीदिन १०रुपये.
प्रलंबित प्रकरणे
जर महाविद्यालयांकडून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ व २०२१-२२ मधील काही प्रलंबित प्रकरणे असल्यास त्या त्या महाविद्यालयांनी व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार दंड भरून १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विद्यापीठात आणून जमा कराव्यात, असे निर्देश विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी दिले आहेत.
पुनरावलोकन समिती
अडचणी आणि शंका निवारणासाठी विद्यापीठाने पुनरावलोकन समितीची स्थापना केली आहे. यात कुलसचिव, संचालक (परीक्षा व मूल्यमापन मंडळ ), उपकुलसचिव (परीक्षा व निकाल), उपकुलसचिव (प्रवेश,नावनोंदणी,पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र विभाग) यांचा समावेश असेल.