मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा संचालकपदी पूजा रौंदाळे, निकालातील विलंब दूर होण्याची अपेक्षा
By रेश्मा शिवडेकर | Published: January 3, 2024 01:33 PM2024-01-03T13:33:25+5:302024-01-03T13:34:02+5:30
मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात महिलेची परीक्षा मंडळाच्या संचालकपदी (आधीचे परीक्षा नियंत्रकपद) निवड होण्याची ही दुसरी वेळ आहे.
मुंबई : निकाल विलंब, त्यातील घोळ यांमुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या ‘परीक्षा व मूल्यमापन मंडळा’ला अखेर सव्वा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर संचालक लाभले आहेत. ‘सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (एसपीआयटी) प्राध्यापिक पूजा रौंदाळे यांची मंडळाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात महिलेची परीक्षा मंडळाच्या संचालकपदी (आधीचे परीक्षा नियंत्रकपद) निवड होण्याची ही दुसरी वेळ आहे.
वर्षभरापासून अधिक काळ मंडळाच्या संचालकपदाचा कार्यभार प्रभारी अधिकारी डॉ. प्रसाद कारंडे यांच्याकडे होता. दोनवेळा या पदाकरिता नियुक्तीची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र दोन्ही वेळा ती रद्द करण्यात आल्याने हे पद रिक्त होते. विद्यापीठाच्या परीक्षाविषयक कामाचा व्याप मोठा आहे. चार विद्याशाखांमध्ये मिळून विद्यापीठ सुमारे ४५० परीक्षा दरवर्षी घेते. या परीक्षांचे नियोजन, मूल्यमापन, निकाल, पुनर्मूल्यांकन हा कामाचा पसारा मोठा आहे. त्यात अनेक परीक्षांचे निकाल लांबत असल्याने संचालकपदी पूर्णवेळ अधिकाऱ्याची तत्काळ नियुक्ती करण्याची मागणी होत होती.
नियुक्ती पाच वर्षांसाठी
प्रा. रौंदाळे अंधेरीच्या ‘एसपीआयटी’तील मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांनी एसएनडीटी विद्यापीठातून पीएच.डी. केली आहे. त्याआधीचे त्यांचे पदवी-पदव्युत्तर शिक्षण जळगावच्या ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा’तून झाले आहे. आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स, डेटा सायन्स, मशिन लर्निंग हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. पुढील पाच वर्षे त्या परीक्षा संचालक म्हणून कार्यरत राहतील.
दुसऱ्या परीक्षा संचालक
याआधी २०१३ साली पद्मा देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकपदी नेमणूक करण्यात आली होती. त्या विद्यापीठाच्या पहिल्या महिला परीक्षा नियंत्रक ठरल्या होत्या. पेपरफूट, निकालाच्या विलंबामुळे अत्यंत अडचणीच्या ठरलेल्या काळात देशमुख यांनी या पदाची जबाबदारी सांभाळली होती.
- डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या पदासाठीच्या इच्छुकांपैकी १२ जणांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांपैकी तिघेजण गैरहजर होते. मुलाखत दिलेल्या आठजणांमधून रौंदाळे यांची निवड करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कामाचा अनुभव असलेले के. ए. पराड आणि प्रवीण शिनकर यांचाही मुलाखत देणाऱ्यांमध्ये समावेश होता.