रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई विद्यापीठाने मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बी.कॉम सत्र ६ या महत्वाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेचा निकाल ४३.५२ टक्के एवढा लागला आहे. हा निकाल विद्यापीठाने फक्त २४ दिवसांत जाहीर केला आहे. उन्हाळी सत्राच्या आजपर्यंत ८ परीक्षेचे निकाल विद्यापीठाने जाहीर केलेले आहेत.
या परीक्षेत ५४,९०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ५२,४७८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर २१,५९२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. २४२३ विद्यार्थी हे परीक्षेला अनुपस्थित होते. ९५ विद्यार्थ्यांचे निकाल हे कॉपी प्रकरणामुळे राखीव ठेवण्यात आले आहेत. तर ८६८८ विद्यार्थ्यांचे निकाल ते प्रथम किंवा द्वितीय वर्ष उत्तीर्ण नसल्याने राखीव ठेवण्यात आले आहेत.