अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या उद्या होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द; परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 10:01 PM2022-07-13T22:01:27+5:302022-07-13T22:04:52+5:30
उद्या मुख्यतः इंजिनिअरिंग विद्याशाखेच्या परीक्षा आहेत. त्याचबरोबर इतरही विद्याशाखेच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली.
मुंबई : राज्यात पावसाच्या जोरधारा कायम असून अनेक नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने उद्या गुरुवार, १४ जुलै २०२२ रोजीच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
उद्या मुख्यतः इंजिनिअरिंग विद्याशाखेच्या परीक्षा आहेत. त्याचबरोबर इतरही विद्याशाखेच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली. दरम्यान, आता पुढील ४८ तासात महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील अत्यावश्यक कामे करणारी शासकीय कार्यालये वगळता सर्व शाळा, महाविद्यालये आणि इतर आस्थापने १६ जुलैपर्यंत बंद राहतील. रेड अलर्ट (अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा) पाहता प्रशासनाने १० ते १३ जुलैपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी बुधवारी या आदेशाला १६ जुलैपर्यंत वाढ दिली.