Join us

मुंबई विद्यापीठास ‘वर्ग-१’ दर्जा; ‘यूजीसी’चा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 9:31 AM

‘यूजीसी’चा निर्णय, विविध शैक्षणिक संधीचे दालन खुले होणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) मुंबई विद्यापीठास वर्ग-१ विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. नॅककडून अ   श्रेणी आणि ३.६५ सीजीपीए गुणांकन असलेल्या मुंबई विद्यापीठास वर्ग-१ ग्रेडेड ऑटोनॉमीचा दर्जा बहाल करण्यात आल्यामुळे विविध शैक्षणिक संधीचे दालन खुले होणार आहे.

या दर्जामुळे विद्यापीठास यूजीसीच्या परवानगी सुलभतेसह नवीन अभ्यासक्रम, नवीन विभाग, नवीन संकुल, नवीन ऑनलाइन अभ्यासक्रम, दूर व मुक्त अध्ययन संस्थेचे नवीन अभ्यासक्रम सुरू करता येतील. तसेच आवश्यकतेनुसार  स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गरजा ओळखून नावीन्यतेच्या क्षेत्रात पदवी व पदविका अभ्यासक्रमही विद्यापीठास सुरू करता येतील. विद्यापीठास मिळालेल्या या वर्ग-१ च्या दर्जामुळे नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्कच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठास कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करता येतील. वर्ग-१ विद्यापीठाच्या दर्जामुळे विद्यापीठास आता स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर रिसर्च पार्क, इन्क्युबेशन सेंटर्स आणि युनिव्हर्सिटी सोसायटी लिंकेजेस् सेंटर्सची स्थापना करता येणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणासाठी परदेशी उच्च शिक्षण संस्थांसोबत शैक्षणिक सामंजस्य करणे आता अधिक सुकर झाले आहे. याद्वारे दुहेरी पदवी, सह पदवी आणि ट्वीनिंग पदवी, विद्यार्थी शिक्षक आदान-प्रदान प्रक्रिया सुलभ होणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ग्रँट ऑफ ग्रेडेड ऑटोनॉमी रेग्युलेशन, २०१८ च्या नियमनानुसार विद्यापीठास मिळालेल्या या दर्जामुळे विद्यापीठास शैक्षणिक स्वातंत्र्य मिळाले आहे. याद्वारे मुंबई विद्यापीठात विविध शैक्षणिक संधीचे नवीन दालन आता खुले होईल. उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने विद्यापीठास मोठे पाऊल टाकता येणार आहे. शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमासोबत कौशल्याधारित शिक्षण, नवीन अभ्यासक्रम, ऑनलाइन अभ्यासक्रम, उपपरिसरांच्या निर्मितीसह अनेक उपक्रम आता विद्यापीठात सुरू करता येतील. विशेष म्हणजे या दर्जामुळे दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या ( आयडॉल) सक्षमीकरणास मोठे हातभार लागणार आहे.- प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

टॅग्स :मुंबईशिक्षण क्षेत्रमुंबई विद्यापीठ