मुंबई विद्यापीठाची स्पर्धा आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी... !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:14 AM2021-09-02T04:14:23+5:302021-09-02T04:14:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई मुंबई विद्यापीठाला राज्यातील इतर विद्यापीठांहून उच्च मानांकन मिळाल्याने साहजिकच आता त्याची स्पर्धा ही इतर राष्ट्रीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
मुंबई विद्यापीठाला राज्यातील इतर विद्यापीठांहून उच्च मानांकन मिळाल्याने साहजिकच आता त्याची स्पर्धा ही इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी होणार आहे. तेव्हा विद्यापीठ प्रशासनाने अधिकाधिक विद्यार्थी केंद्री व्हायला हवे असे मत सिनेट सदस्य व्यक्त करीत आहेत. मुंबई विद्यापीठाला नॅककडून अ ची श्रेणीसह सर्वोत्कृष्ट मानांकन प्राप्त होणे हे अत्यंत अभिमानस्पद बाब असून यापुढील मुंबई विद्यापीठाची कामगिरी ही विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासून ते अत्यंत महत्त्वाच्या विषयांत मार्गदर्शक ठरणारी असावी असे मत अभ्यासक व्यक्त करीत आहेत.
ज्याप्रमाणे प्राध्यापकांना संशोधन निधी देऊन त्यांच्या संशोधनांना चालना दिली जाते. विद्यार्थी संशोधनासाठी निधी राखीव ठेवून त्याला प्रोत्साहन द्यावे अशी अपेक्षा सिनेट सदस्य गुलाबराव राजे यांनी व्यक्त केली आहे. नॅक मूल्यांकनात विद्यापीठातील बांधकामे आणि महाविद्यालयांच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा मोठा प्रभाव असल्याने ज्या काही इमारतीचे बांधकाम अपूर्ण आहे ते वेळेत पूर्ण करून विद्यार्थी सोयीनुसार त्यांची स्वच्छता राखण्याचा प्रशासनाने अधिकाधिक प्रयत्न करायला हवा असे मत त्यांनी व्यक्त केले.
औद्योगिक क्षेत्राला आणि भौगोलिक परिस्थितीला अनुसरून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात कोणत्या कौशल्यपूर्ण अभ्यासाची गरज आहे. याचे सर्वेक्षण करून त्याप्रकारचे अभ्यासक्रम, अभ्यासक्रमाची पुनर्रचना करून ते संबंधित जिल्ह्यात सुरू करणे विद्यापीठाकडून अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नॅक मूल्यांकनाच्या मदतीने शासनाकडून रिक्त प्रशाकीय जागा भरून घेण्याची परवानगी विद्यापीठाने घ्यावी आणि प्रशासकीय व्यवस्थापनात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करावे असेही त्यांनी सुचविले आहे.
सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांच्या मते विद्यापीठाने आता डिजिटल होण्याची अधिक गरज आहे. नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात, कारण विद्यार्थ्यांना या नॅक मूल्यांकनाचा सगळ्यात अधिक उपयोग होणे अपेक्षित आहे. नॅक दर्जामुळे केंद्रीय योजना आणि निधीचा विनियोग विद्यापीठ आणि विद्यार्थी हिताच्या योजनांसाठी करून घेणे सुलभ झाल्याने विद्यापीठाने याकडे लक्ष द्यायला हवे. नॅक मूल्यांकनात विद्यापीठाला विद्यापीठातील विविध विभाग, तेथील प्राध्यापक, प्राचार्य, कर्मचारी या साऱ्यांचाच सहयोग मिळाल्याने आता त्यांच्या प्रश्नांकडे ही गांभीर्याने पाहून ते सोडविण्याची गरज तांबोळी यांनी व्यक्त केली.
-------
नॅक दर्जा प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून असणाऱ्या काही अपेक्षा
- अधिक डिजिटल पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. यासाठी विविध विभागाच्या नवीन ऑनलाईन प्रणाली असल्या तरी त्या एकाच क्लिकवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध व्हाव्यात.
- नवीन उपकेंद्रे लवकरात लवकर सुरु व्हावीत
- विद्यार्थ्यांना निकाल, स्थलांतर प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्रे यांमध्ये येणाऱ्या अडचणी तातडीने सुटाव्यात
- नवीन अभ्यासक्रम सुरू व्हावेच पण जुन्या अभ्यासक्रमांची ही आवश्यकतेनुसार पुनर्रचना व्हावी ''-