मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरात रविवारच्या रात्रीपासूनच कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा तडाखा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला बसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई महानगरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
मुंबई महानगरात सोमवारी दुपारी १:५७ वाजता समुद्राला भरती येऊन ४.४० मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. त्यामुळे खबरदारीचा उपाय आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.
विद्यापीठाच्या परीक्षा १३ जुलै रोजी
जोरदार वृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या दुरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राने (आयडॉल) सोमवारच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या सर्व परीक्षा बुधवार, १३ जुलै रोजी होतील. परीक्षेची वेळ आणि परीक्षा केंद्रात कोणताही बदल झालेला नाही, असे 'आयडॉल'ने स्पष्ट केले आहे.
मुंबई विद्यापीठाची बी.एस्सी. हॉस्पिटॅलिटी स्टडीज या अभ्यासक्रमाची पाचव्या सत्राची 'एटीकेटी' परीक्षा सोमवारी नियोजित होती; परंतु रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने सुटी जाहीर केल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.
अतिवृष्टीचा फटका; तातडीने निर्णय
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ८ जुलै रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र, मुंबईत होत असलेल्या अतिवृष्टीचा फटका या परीक्षेला बसल्याने एमपीएससीने तातडीने उपाययोजना केल्या. कौशल्य टंकलेखन परीक्षेसाठी राज्यभरातून उमेदवार मुंबईत आले होते आणि एकूण चार सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, मुंबईत अतिवृष्टी सुरू असल्याने या परीक्षेच्या नियोजनाला फटका बसला.
चारही सत्रांची टंकलेखन कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा ४५ मिनिटे उशिराने सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला, तसेच उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्याची अंतिम वेळ प्रत्येक सत्राकरिता ४५ मिनिटांनी वाढवण्यात आल्याची माहिती एमपीएससीने दिली.
विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या
मुंबई विद्यापीठाच्या मंगळवार, ९ जुलै रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.