मुंबई विद्यापीठ डिजिटायझेशनकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:23 AM2019-07-10T00:23:17+5:302019-07-10T00:23:22+5:30
व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सेवा सुरू : विद्यार्थी, सलग्न महाविद्यालयांशी साधणार संपर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाची संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांतील प्राचार्य, संचालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याशी संवाद साधण्यासाठी विद्यापीठाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सेवा मंगळवारपासून सुरू केली आहे. या उपक्रमातील पहिल्या टप्प्याअंतर्गत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी मुंबई आणि मुंबई उपनगर येथील ३६ महाविद्यालयांशी संवाद साधला. विद्यापीठाने प्रथमच ही सेवा कार्यान्वित केली असून, याद्वारे वेळोवेळी विद्यापीठाशी संलग्नित भागधारकांशी संवाद साधला जाणार असल्याचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाने कार्यान्वित केलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाविद्यालयातील प्राचार्यांशी संवाद साधताना कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी महाविद्यालयातील परीक्षा, वेळापत्रक, वाढीव जागा, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम अशा विविध बाबींवर चर्चा केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका वेळी २०० महाविद्यालयांशी संपर्क साधण्याची यंत्रणा विद्यापीठाने तयार केली असून, यामध्ये सहभागी महाविद्यालयांना लिंक पाठवून संवाद साधला जाऊ शकतो.
ही यंत्रणा मोबाइल आणि लॅपटॉपद्वारेही कार्यान्वित केली जाऊ शकते. मुंबईतील नामांकित आणि महत्त्वाच्या महाविद्यालयांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये एच आर महाविद्यालय, चेतना महाविद्यालय, के. जे. सोमय्या, भवन्स, विल्सन, गुरुनानक, पोदार, रुईया, सोफिया, एमडी, झुनझुनवाला, सेंट झेविअर्स, सराफ अशा महाविद्यालयांचा समावेश आहे. या संपूर्ण सेवेचे कालबद्ध नियोजन विद्यापीठामार्फत केले जाणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सुमारे १० लाख विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि पदवी डिजिटायझेशनच्या उपक्रमांतर्गत नॅशनल अकॅडेमिक डिपॉझिटरी - यूजीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून, यामुळे पदवीची सत्यता तपासणे सुलभ होणार आहे.
नॅशनल अकॅडेमिक डिपॉझिटरी-यूजीसीची राष्ट्रीय पातळीवरील आढावा बैठक मुंबई विद्यापीठात झाली़ या वेळी राज्यातील तब्बल ८० संस्थांनी आपला सहभाग दर्शविला होता. सर्व पदवी व गुणपत्रिकांचे आॅनलाइन २४ बाय ७ स्टोअर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे़ या उपक्रमाद्वारे विद्यापीठाचा स्तर जागतिक दर्जाचा होईल यात शंका नाही, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी सांगितले.
२०० महाविद्यालयांशी होणार थेट संपर्क
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका वेळी २०० महाविद्यालयांशी संपर्क साधण्याची यंत्रणा विद्यापीठाने तयार केली असून, यामध्ये सहभागी महाविद्यालयांना लिंक पाठवून एकाच वेळी संवाद साधला जाऊ शकतो.