मुंबई विद्यापीठ :उत्तरपत्रिका गहाळ झालेल्यांना दिलासा, विद्यार्थ्यांना सरासरी गुण मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 03:04 AM2017-12-20T03:04:47+5:302017-12-20T03:05:02+5:30
विद्यापीठाकडून उत्तरपत्रिका गहाळ झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा मंडळाने मोठा दिलासा दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी विद्यापीठाकडून मिळू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा ठराव परीक्षा मंडळाने नुकताच मंजूर केल्याचे विद्यापीठाने उच्च न्यायालयात सांगितले.
मुंबई : विद्यापीठाकडून उत्तरपत्रिका गहाळ झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा मंडळाने मोठा दिलासा दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी विद्यापीठाकडून मिळू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा ठराव परीक्षा मंडळाने नुकताच मंजूर केल्याचे विद्यापीठाने उच्च न्यायालयात सांगितले.
विधि अभ्यासक्रमाचे चार विद्यार्थी एका विषयात नापास झाल्याने त्यांनी संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी देण्यासाठी विद्यापीठाकडे अर्ज केला. मात्र, विद्यापीठाने त्या विषयाची फोटोकॉपी देण्यास असमर्थता व्यक्त केली. या उत्तरपत्रिका विद्यापीठाकडून गहाळ झाल्या आहेत. त्यामुळे या चारही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या.
विद्यापीठाला उत्तरपत्रिका शोधून त्यांची फोटोकॉपी देण्याचे निर्देश द्यावेत किंवा नापास झालेल्या विषयात सरासरी गुण देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती चारही विद्यार्थ्यांनी न्यायालयाला केली. या याचिकांवरील सुनावणी न्या. भूषण गवई व न्या. बी.पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे होती.
गेल्या आठवड्यात न्यायालयाने याबाबत मुंबई विद्यापीठाला फैलावर
घेतले होते. उत्तरपत्रिका गहाळ कशा होतात, असा सवाल न्यायालयाने विद्यापीठाला केला होता.
न्यायालयाच्या या प्रश्नावर विद्यापीठाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे न्यायालयाने विद्यापीठाला यातून मार्ग काढण्यास सांगितले होते. त्यानुसार मंगळवारच्या सुनावणीत विद्यापीठाने ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन पास करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे यासंबंधीच्या याचिका निकाली काढल्या.