मुंबई विद्यापीठ अंतिम फेरीत, गोलंदाजांची निर्णायक कामगिरी, महिला क्रिकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 02:12 AM2018-01-16T02:12:05+5:302018-01-16T02:12:15+5:30
फलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर गोलंदाजांच्या अचूक माºयाच्या जोरावर मुंबई विद्यापीठ संघाने पश्चिम विभागीय आंतरमहाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक
मुंबई : फलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर गोलंदाजांच्या अचूक माºयाच्या जोरावर मुंबई विद्यापीठ संघाने पश्चिम विभागीय आंतरमहाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारताना एलएनआयपीई ग्वाल्हेर विद्यापीठाचा ६५ धावांनी पराभव केला. मुंबईकरांनी निर्धारित ४० षटकांत ९ बाद १७० धावांची मजल मारल्यानंतर ग्वाल्हेर संघाचा डाव ३३.४ षटकांत केवळ १०५ धावांमध्ये संपुष्टात आला. विजेतेपदासाठी मुंबईकरांची लढत पुणे विद्यापीठाविरुद्ध होईल.
नाणेफेक जिंकून ग्वाल्हेर संघाने मुंबईकरांना प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करण्यात आलेल्या अपयशामुळे मुंबई विद्यापीठाला ४० षटकांत केवळ ९ बाद १७० धावा उभारता आल्या. मात्र, गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करताना ही छोटी धावसंख्याही आव्हानात्मक ठरवली. १७१ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या ग्वाल्हेर संघाच्या फलंदाजांना अचूक माºयाच्या जोरावर मुंबईकरांनी जखडवून ठेवले. नेहा रंगराजन (३/२५), अनघा नार्वेकर (२/१८) आणि सेजल जाधव (२/१३) या त्रिकूटाने अप्रतिम मारा करत ग्वाल्हेरच्या फलंदाजीला खिंडार पाडले. अमिता दुबे हिने ग्वाल्हेरकडून एकाकी झुंज देताना ८१ चेंडंूत ७ चौकारांसह ६७ धावांची खेळी केली. परंतु इतर फलंदाजांकडून तिला अपेक्षित साथ मिळाली नाही.
तत्पूर्वी, प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर निधी दावडा हिने ७० चेंडूंत ३ चौकारांसह ४९ धावांची झुंजार खेळी केली. तिचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. मधुरा माधवने ४७ चेंडूंत २२ धावा काढत तिला चांगली साथ दिली. भारती चौधरीने भेदक मारा करताना २२ चेंडूंत मुंबईचा अर्धा संघ बाद केला.
परंतु, मुंबईकर गोलंदाजांनी दुसºया डावात उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत मुंबईचा विजय साकारला. अन्य एका उपांत्य सामन्यात पुणे विद्यापीठाने ग्वाल्हेर एमआयटी विद्यापीठ संघाला पराभूत करत अंतिम फेरी गाठली.