Join us

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आजपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 3:18 AM

नियोजनानुसारच होणार आयोजन; शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा परिणाम नाही

मुंबई : राज्यातील अनेक विद्यापीठांच्या गुरुवारपासून सुरू होणाºया परीक्षा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे पुढे ढकलल्या जात असताना मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा मात्र ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच होणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. सध्या राज्यातील १४ अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी सातवा वेतन आयोग आणि इतर मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन केले आहे. गुरुवारपासून त्यांचे काम बंद आंदोलन सुरू होणार असून अंतिम वर्षाच्या परीक्षांना असहकार करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. यामुळे नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जळगावसारख्या विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयाचे क्लस्टर्स करून लीड महाविद्यालयांवर परीक्षांची जबाबदारी सोपविल्याने शिक्षकेतर कर्मचाºयांच्या आंदोलनाचा फटका परीक्षांना मोठ्या प्रमाणात बसणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

क्लस्टर्समधील महाविद्यालयांनी प्राध्यापकांकडून आवश्यक ती तयारी करून घेतली आहे आणि आॅनलाइन परीक्षेचे नियोजनही तयार आहे. विद्यापीठ विभाग आणि आयडॉलच्या परीक्षाच विद्यापीठामार्फत होणार असल्याने त्याची तयारी विद्यापीठाकडून एजन्सीची नेमणूक झाल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षा नीट पार पडतील, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेवर आणि कोणतीही बाधा न येता पूर्ण होतील याची जबाबदारी क्लस्टरमधील लीड महाविद्यालयांची असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.आंदोलन मागे घ्या; शिक्षणमंत्र्यांची विनंतीशिक्षकेतर कर्मचाºयांच्या संघटनांसोबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तात त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी विभागाकडून १ ते २ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे म्हटले आहे. तरी सामंत यांनी शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीचे समन्वयक रमेश डोंगरशिंदे यांच्याशी चर्चा करून येत्या १५ दिवसांत प्रतिनिधींची समक्ष बठक बोलावून प्रश्न सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आंदोलन मागे घेण्याची विनंती टिष्ट्वटद्वारे केली आहे.

टॅग्स :मुंबईपरीक्षा