Join us

मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्याना अखेर परीक्षेसाठी दिला वेळ; युवासेनेच्या घेरावासमोर प्रशासन नरमले, परीक्षा पुढे ढकलली

By सीमा महांगडे | Published: September 30, 2022 4:21 PM

मुंबई विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांतील तृतीय वर्षातील पाचव्या सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: मुंबईविद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांतील तृतीय वर्षातील पाचव्या सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले होते. त्यानुसार या परीक्षा १३ ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. मात्र शैक्षणिक वर्ष विलंबाने सुरू झाल्याने परीक्षा दिवाळीनंतर घ्याव्या अशी मागणी मुंबईतील अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. मात्र विद्यापीठ प्रशासनाने मागणी धुडकावून लावल्याने युवासेनेने गुरूवारी आक्रमक भूमिका घेत परीक्षा नियंत्रकांना घेराव घातला. अखेर विद्यापीठ प्रशासनाने नमते घेत दिवाळीनंतर परीक्षा घेण्याचे जाहीर केले. 

गतवर्षीच्या कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष विलंबाने सुरू झाले होते. त्याचा परिणाम यंदाच्या शैक्षणिक वर्षावर होऊन यंदा महाविद्यालये उशीराने सुरू झाली. त्यातच मुंबई विद्यापीठाने नियमित वेळापत्रकानुसार तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. ही परीक्षा १३ ऑक्टोबरपासून घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले. परंतु शैक्षणिक वर्ष विलंबाने सुरू झाल्याने परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी फारसा वेळ मिळालेला नसल्याने ही परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात यावी, अशी मागणी मुंबईतील अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थी व शिक्षकांकडून विद्यापीठाकडे करण्यात आली होती. माटुंगामधील डी. जी. रुपारेल महाविद्यालय, परळमधील महर्षी दयानंद महाविद्यालय, विक्रोळीतील विकास महाविद्यालय, वांद्रे येथील रिझवी महाविद्यालय, नॅशनल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला पत्र पाठवले होते. 

मात्र विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांकडून ती फेटाळून लावण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी युवासेनेकडे धाव घेतली. युवासेनेने विद्यार्थ्यांची बाजू समजून घेत गुरूवारी विद्यापीठाच्या कलिना परिसरातील परीक्षा भवनमध्ये परीक्षा नियंत्रकांना घेराव घातला. तसेच पाचव्या सत्राची परीक्षा दिवाळीनंतर घेण्याची मागणी केली. मात्र नियंत्रक आपल्या मतावर ठाम असल्याने युवासेनेने आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत विद्यापीठ प्रशासन निर्णय घेणार नाही, तोपर्यंत परीक्षा नियंत्रक कार्यालयात घातलेला घेराव मागे घेणार नाही अशी भूमिका युवासेनेने घेतली.

त्यामुळे हतबल झालेल्या परीक्षा नियंत्रकांनी अखेर युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे आणि मिलिंद साटम यांच्यासोबत चर्चा करून १३ ऑक्टोबर २०२२ होणारी परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. यामुळे विद्यापीठ संलग्नित जवळपास ८५० महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

कुलगुरूंचे हितसंबंध जोपासण्यासाठी विद्यापीठ प्रशासन एका दिवसांत चार समित्यांच्या बैठका घेऊ शकते. परंतु विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत नाही. हे फारच निंदनीय आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व त्यांना परीक्षेची तयारी करण्यास पुरेसा वेळ मिळावा यासाठीच आम्ही आक्रमक भूमिका घेत त्यांना न्याय मिळवून दिला आहे. - प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य, युवासेना

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मुंबईविद्यापीठ