Join us  

मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणूक: उद्धवसेनेची युवासेना आणि अभाविपमध्येच मुख्य लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 6:55 AM

शिंदेंची युवासेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची माघार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील बहुप्रतिक्षित सिनेट निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत उद्धवसेनेची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदपुरस्कृत विद्यापीठ विकास मंच यांच्यामध्येच लढत होणार आहे. मनसेची विद्यार्थी संघटना मनविसे आणि शिंदेसेनेची युवासेना यांनी उमेदवारच दिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठाने सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम ४ ऑगस्टला जाहीर केला होता. पदवीधर मतदारसंघाच्या १० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यानुसार इच्छुक पदवीधरांना १२ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार होते. शेवटच्या दिवसापर्यंत विद्यापीठाकडे ५२ अर्ज दाखल झाले होते. त्यात उद्धवसेनेच्या युवासेनेने १० अर्ज आणि विद्यापीठ विकास मंचाने १० अर्ज भरले आहेत. त्याचबरोबर छात्र भारती विद्यार्थी संघटनेने तीन अर्ज दाखल केले आहेत.

या निवडणुकीत मनसेचे सचिव असलेल्या आणि माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनीच अर्ज भरला आहे. त्यामुळे मनविसेचे अन्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. याबाबत मनविसेच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही. दरम्यान, शिंदे सेनेच्या युवासेनेने उमेदवार दिले नसल्याच्या वृत्ताला पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. त्याचबरोबर मतदारनोंदणी कमी झाल्याने न्यायालयात जाण्याच्या पर्यायाचाही विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांनीही अर्ज भरले आहेत.

केवळ १३,४०६ मतदार

नव्या मतदार नोंदणीत विद्यापीठाच्या पदवीधर जागांसाठी २६,९४४ पदवीधरांनी नोंदणी केली होती. विद्यापीठाने जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीत ५० टक्क्यांहून अधिक मतदारांना अपात्र करण्यात आले आहे. परिणामी, विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील सिनेट निवडणुकीसाठी केवळ १३,४०६ मतदार उरले आहेत. आता या निवडणुकीसाठी २२ सप्टेंबरला मतदान होईल, तर मतमोजणी २५ सप्टेंबरला होईल, असे विद्यापीठाने जाहीर केले आहे.

विद्यापीठाच्या सिनेटची मुदत सप्टेंबर २०२२ मध्ये संपुष्टात आली होती. त्यानंतर लागलीच नवी सिनेट निवडून येणे अपेक्षित होते. मात्र, विद्यापीठाने २२ नोव्हेंबर २०२२ मध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यावेळी निवडणुकीसाठी एक लाख १३ हजार पदवीधरांनी मतदार म्हणून नोंदणी केली होती.

विद्यापीठाने मतदारअर्जांची छाननी केल्यावर ९० हजार पदवीधरांची नोंदणी अंतिम झाली होती. मतदार यादी ९ ऑगस्ट २०२३ ला विद्यापीठाने जाहीर करून त्याचदिवशी निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला होता. मात्र, भाजपनेते आशिष शेलार यांनी बोगस मतदारांची नोंदणी केल्याचा आरोप केला. राज्य सरकारच्या सूचनेनुसार विद्यापीठाने ही निवडणूक रद्द करून नव्याने मतदार नोंदणी केली.

टॅग्स :मुंबई विद्यापीठनिवडणूक 2024शिवसेनाभाजपा