दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची हेल्पलाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 06:26 AM2020-09-20T06:26:27+5:302020-09-20T06:26:39+5:30

परीक्षेचे प्रवेश अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख

Mumbai University helpline for disabled students | दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची हेल्पलाइन

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची हेल्पलाइन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षातील परीक्षांसाठी नियमित विद्यार्थ्यांसोबतच दिव्यांग विद्यार्थ्यांची ही विद्यापीठाकडून काळजी घेण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन सुविधा विद्यापीठाकडून सुरू करण्यात आली आहे.


यासाठी विद्यापीठाने ९४०५३२८९७६ आणि ७०५८३२८९७६ हे दोन संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. परीक्षेच्या दरम्यान ज्या दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यकता भासेल, अशा विद्यार्थ्यांनी या दोन संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.विनोद पाटील यांनी सांगितले आहे.


दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधांसह परीक्षांचे नियोजन करताना विद्यापीठाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले असून, परीक्षेच्या दरम्यान दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक व परीक्षेसाठी वाढीव वेळ अशा अनुषंगिक बाबींसाठी काही शंका असल्यास असे विद्यार्थी या संपर्क क्रमांकावर फोन करून त्यांच्या शंकांचे समाधान करू शकतील.


परीक्षेचे प्रवेश अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख
दरम्यान अंतिम वर्ष परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या बॅकलॉग परीक्षेचे प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यापीठाने दिनांक १८ ते २० सप्टेंबर, २०२० या तीन दिवसांत विहित शुल्कासह विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परीक्षेचे प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली असून, आज २० सप्टेंबर, २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत परीक्षेचे प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
विद्यापीठाने यासाठी सर्व संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठ विभागासाठी परिपत्रक निर्गमित केले असून, करावयाची कार्यवाही नमूद केलेली आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेश अर्ज करण्यापूर्वी महाविद्यालयांनी संबंधित विद्यार्थ्यांचे छायाचित्र, स्वाक्षरी, नाव, (मराठी व इंग्रजी या दोन्ही लिपीत) माध्यम, परीक्षा केंद्र, विषय व दिव्यांग इत्यादी बाबींची खातरजमा करून परीक्षा प्रवेश अर्ज इनवर्ड करणे गरजेचे असून, प्रवेश अर्ज इनवर्ड झाल्यावर कोणतीही दुरुस्ती करता येणार नसल्याचे परिपत्रकात नमूद आहे.

Web Title: Mumbai University helpline for disabled students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.