मुंबई : मुंबईविद्यापीठाने वसतिगृहाच्या शुल्कात जवळपास दुप्पट वाढ केली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार असून, यावरून विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच ही शुल्क वाढ तत्काळ रद्द करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.
विद्यापीठाची मुलींसाठी सावित्रीबाई फुले वसतिगृह, न्यू गर्ल्स हॉस्टेल, मॅडम कामा गर्ल्स हॉस्टेल, महर्षी धोंडो केशव कर्वे गर्ल्स हॉस्टेल, तर मुलांसाठी कर्मवीर भाऊराव पाटील हॉस्टेल व जगन्नाथ शंकरशेठ हॉस्टेल, अशी सहा वसतिगृहे आहेत. विद्यापीठाच्या २९ जूनच्या परिपत्रकानुसार पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृहाचे शुल्क पाच हजार ५०० रुपयांवरून १० हजार ५०० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. ही तब्बल ९१ टक्के एवढी वाढ आहे. तर, पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांचे शुल्क पाच हजार ५०० वरून थेट ११ हजार ५०० रुपये केले आहे. ही वाढ तब्बल १०९ टक्के एवढी आहे. विद्यापीठाच्या वसतिगृहातील अतिथी रूमचे शुल्कही तिप्पट केले आहे. विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क १०० रुपयांवरून ३०० रुपये, तर अन्य व्यक्तींसाठी ५०० रुपये करण्यात आले आहे.
...अन्यथा आंदोलन
१) मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहात शिकणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील असून, गरीब कुटुंबातून येतात. एकीकडे वसतिगृहामध्ये मूलभूत सुख-सुविधांची वानवा आहे. वायफाय, चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी, साफसफाई आदी मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी विद्यार्थी संघर्ष करत आहेत.
२) मुंबई विद्यापीठाने याकडे डोळेझाक केले आहे. आता वसतिगृहाचे शुल्क एकदम पाच हजार रुपयांनी वाढविले आहे. त्यामुळे ती तत्काळ रद्द करावी. अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरद पवार गट) मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी प्र-कुलगुरू अजय भामरे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.