Join us

मुंबई विद्यापीठाचे जून-जुलैच्या परीक्षांचे निकाल अद्यापही रखडलेले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 10:02 AM

दरवर्षी लांबलेल्या निकालांमुळे मुंबई विद्यापीठ चर्चेत येते.

मुंबई : ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या परीक्षांचे निकाल वेळेत लावल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या मुंबई विद्यापीठाने गेल्यावर्षी जून-जुलैमध्ये झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर पदवी परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे पुढील अभ्यासाचे, परीक्षांचे, करिअर आणि पीएचडी प्रवेशाचे नियोजन कोलमडले आहे.

विद्यापीठाला परीक्षेचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर करावे लागतात. दरवर्षी लांबलेल्या निकालांमुळे विद्यापीठ चर्चेत येते. यंदा हिवाळी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या ७५ पैकी ७२ परीक्षांचे निकाल वेळेत लावल्याबद्दल विद्यापीठाने स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. मात्र, जून-जुलैमध्ये घेतलेल्या पदव्युत्तर पदवी परीक्षांपैकी काही परीक्षांचे मोजकेच निकाल विद्यापीठाने जाहीर केले. एमए, एमएस्सी या विद्याशाखांमधील अनेक विद्यार्थी अद्यापही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यापीठांचा दीक्षांत समारंभ दोन दिवसांवर आला तरी निकाल जाहीर केलेले नाहीत, हे विशेष.

पुढील अभ्यासक्रमाला होणार सुरुवात :

पुढील म्हणजे चौथ्या सत्राच्या अभ्यासक्रमावर परिणाम होऊ नये म्हणून काही कॉलेजांनी या सत्राच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली आहे. मात्र, काही कॉलेजांनी अद्यापही सुरुवात केलेली नाही.

तांत्रिक अडचणी :

 गेल्यावर्षी तांत्रिक अडचणी उद्भवल्याने निकालाला विलंब झाल्याची माहिती परीक्षा विभागातील सूत्रांनी दिली. 

 काही निकाल जाहीर करण्यास विलंब झाला. तसेच, काही विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित राहिले. या हिवाळी सत्रात या समस्येचे निराकरण करण्यात आले आहे.जास्त मतदान केंद्र?

सत्र तीनच्या परीक्षेवर परिणाम :

एमए, एमएस्सीच्या सत्र दोन आणि चारच्या नियमित आणि सत्र एक आणि तीनच्या  रिपीटर्सच्या परीक्षा जून-जुलैमध्ये पार पडल्या. या परीक्षांचे निकाल प्रलंबित आहेत. यातील काही विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले आहेत. एमएस्सीच्या काही विद्यार्थ्यांचे निकाल गुरुवारी जाहीर केले. मात्र, अजूनही अनेक विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित आहेत. याचा परिणाम सत्र तीनच्या परीक्षेवर होत आहे.

नोकरी, पीएच.डी.च्या योजना फिस्कटणार :

  आधीच्याच सत्राचे निकाल न लागल्याने या सत्राची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठेवलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आली. परीक्षेबाबतच्या अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यातील नियोजनावर परिणाम होणार आहे. 

  या विद्यार्थ्यांच्या चौथ्या सत्राचा अभ्यासक्रम, परीक्षाच नव्हे तर नोकऱ्या, पीएच.डी.च्या योजनाही फिस्कटणार आहेत. तिसऱ्या सत्राचा अभ्यासक्रमही शिकवून झाला आहे. परंतु, जानेवारीत होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी गोंधळून गेले. परीक्षा पुढे ढकलण्याचे परिपत्रक येऊनही महिना उलटला. परंतु, परीक्षांचा अद्याप पत्ता नाही.

टॅग्स :मुंबई विद्यापीठपरीक्षाविद्यार्थी