मुंबई विद्यापीठ सुरू करणार कॉल सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:05 AM2021-07-04T04:05:32+5:302021-07-04T04:05:32+5:30
कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विद्यार्थ्यांच्या शंका, अडचणी यांचे निवारण करण्यासाठी विद्यापीठामार्फत कॉलसेंटर ...
कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विद्यार्थ्यांच्या शंका, अडचणी यांचे निवारण करण्यासाठी विद्यापीठामार्फत कॉलसेंटर सुरू केले जाणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना दिली.
चारित्र्याची सचोटी जोपासताना फक्त पुस्तकी शिक्षणातून नव्हे, तर आपल्या दैनंदिन जीवनक्रमात आपल्या वागणुकीतूनही ती सहजपणे जोपासता येत असल्याचे सांगून, माझे म्हणून जगण्यापेक्षा आपले म्हणून जगण्याची कला विकसित करण्यावर विद्यार्थ्यांनी अधिक भर द्यावा, असा अमूल्य मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘प्रश्न विद्यार्थ्यांचे उत्तर कुलगुरूंचे’ या सदराखाली आयोजित केलेल्या आभासी कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून प्रश्न मागविण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची छाननी करून विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे कुलगुरूंनी दिली. सहा हजारांहून अधिक विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पदवीच्या प्रथम वर्षाला प्रविष्ट होऊ इच्छिणारे विद्यार्थी तसेच पदवी अभ्यासक्रमांना प्रविष्ट असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न, शंका, समस्या उपस्थित केल्या. ज्यामध्ये ऑनलाइन शिक्षणातील अडचणी, इंटरनेटची सुविधा, प्रात्यक्षिके, अभ्यासक्रम, शुल्क माफी, लसीकरण, पीडीएफ स्वरूपात पुस्तके उपलब्ध करून देण्याची विद्यार्थ्यांची विनंती अशा प्रश्नांची उत्तरे कुलगुरूंनी दिली.
महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी अपघात विमा योजनेचे स्वरूप विस्तारित करून अचानक उद्भवणारे आजार, कोरोनामुळे बाधितांना मदत यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तसेच कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क माफी, कमवा व शिका या योजनेचा विस्तार करण्यावर विद्यापीठाचा अधिक भर असल्याचे त्यांनी नमूद केले. बदलत्या शिक्षणपद्धतीनुसार विद्यापीठाने अधिकाधिक अभ्यासक्रमांना कौशल्याची जोड दिली असून, कौशल्याधारित शिक्षण पद्धतीचा स्वीकार तसेच नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणपद्धतीत होणाऱ्या बदलांना अनुषंगून विद्यापीठामार्फत पावले टाकली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. येत्या काळात तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षण हे अधिक बळकट होणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांनीही तयारी करावी, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.