मुंबई विद्यापीठाच्या अजब कारभाराचा विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 04:07 PM2018-04-17T16:07:54+5:302018-04-17T16:07:54+5:30
मुंबई विदयापीठातील सेमिस्टर 3 चे प्रॅक्टीकल मार्कस हे विदयापीठातील शिक्षक देत असतात.
मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून भोंगळ कारभारामुळे टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या अजब कारभाराचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. यावेळी निमित्त ठरले आहे ते विधी शाखेचे निकाल. विधी शाखेच्या रखडलेल्या निकालांपैकी तीन निकाल शुक्रवारी 14 एप्रिलला जाहीर झाले. यामध्ये बॅचलर ऑफ लॉ (एलएलबी) सेमिस्टर 4 आणि 6, मास्टर ऑफ लॉ (एलएलएम) सेमिस्टर 3 चा समावेश होता. या शाखेचे निकाल समोर आल्यानंतर अनेक विद्यार्थी चक्रावून गेले. अनेक विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल परीक्षेत नापास करण्यात आले आहे.
मुंबई विदयापीठातील एल.एल.एम सेमिस्टर 3 चा जाहीर केलेला निकाल पाहून विद्यार्थ्याना धक्काच बसला. सेमिस्टर 3 मध्ये दोन लेखी पेपर प्रत्येकी 100 मार्कांचे व 100 मार्कांची एक प्रॅक्टिकल परीक्षा असते. त्यामध्ये हयुमन राईटस लॉ, ग्रुपमध्ये 76 विदयार्थी परीक्षेला बसलेले होते त्यापैकी 22 विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल परीक्षेत 100 गुणांपैकी 50 पेक्षा कमी मार्क देण्यात आलेले आहेत. प्रॅक्टिकलमध्ये 50 पेक्षा कमी मार्क असल्याने त्यांच्यावर नापास होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान झालेले आहे.
मुंबई विदयापीठातील सेमिस्टर 3 चे प्रॅक्टीकल मार्कस हे विदयापीठातील शिक्षक देत असतात. प्रॅक्टिकल मार्कसमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. एल.एल.एम अभ्यासक्रमात एकुण 06 ग्रुप आहेत त्यापैकी इतर 05 ग्रुपमधील विद्यार्थ्याना 100 गुणांपैकी 50 पेक्षा कमी मार्क देण्यात आलेले नाहीत. परंतु हयुमन राईटस ग्रुपमध्ये 76 पैकी 22 विद्यार्थ्याना 100 गुणांपैकी 50 पेक्षाही कमी मार्क देण्यात आले. त्यामुळे लेखी पेपरमध्ये पास होऊनही परीक्षेत नापास होण्याची वेळ विद्यार्थ्यावर आली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या हातात किती इंटरर्नल मार्क ठेवायचे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.