Join us

मुंबई विद्यापीठाचा रशियातील मास्को स्टेट विद्यापीठाशी सामंजस्य करार 

By रेश्मा शिवडेकर | Published: March 26, 2024 5:33 PM

उच्च शिक्षणातील विविध संधीचे दालन खुले.

रेश्मा शिवडेकर, मुंबई : उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत मुंबईविद्यापीठानेरशियातील मास्को स्टेट विद्यापीठाशी शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. या करारान्वये दोन्ही विद्यापीठांदरम्यान विद्यार्थी-शिक्षक आदान –प्रदान, विविध विद्याशाखातील शैक्षणिक कार्यक्रम, विविध ज्ञानशाखांत संशोधन, सह सांस्कृतिक कार्ये आणि शैक्षणिक साहित्य-संसाधन निर्मिती व हस्तांतरण अशा विविध क्षेत्रातील संधीचे दालन खुले होणार आहे. 

या करारानुसार दोन्ही विद्यापीठातील प्राध्यापक आणि संशोधक परिषदा, कार्यशाळा आणि व्याख्यानात सहभागी होऊ शकतील तसेच अध्ययन आणि संशोधनासाठी एकत्रिक कार्य करू शकतील. याच कराराच्या अनुषंगाने स्मार्ट डिजीटल लर्निंग, सांस्कृतिक समन्वय आणि सहकार्यासाठी मुंबई विद्यापीठात व्याख्यान कक्षाच्या निर्मितीसाठी मास्को स्टेट विद्यापीठाने स्वारस्य दाखवले आहे.  

फोर्ट संकुलात आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड, अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापन प्रा. कविता लघाटे, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान प्रा. शिवराम गर्जे, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामरिक अभ्यास केंद्राचे संचालक प्रा. बी. व्ही. भोसले, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय साहचर्य व विद्यार्थी सहाय्य केंद्राचे समन्वयक डॉ. सुनील पाटील, नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. सचिन लढ्ढा यांच्यासह मास्को स्टेट विद्यापीठाकडून अलेक्सी लेबेडेव्ह, संचालक, कला-पॉडगोटोव्हका, आंद्रे सेरोव उपाध्यक्ष, गॅझप्रॉमबँक, मिस्टर इगोर बोचकोव्ह, डेप्युटी व्हाईस-रेक्टर- आंतरराष्ट्रीयीकरण विभागाचे अध्यक्ष, आणि रशियाच्या मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य विभागाचे मिस्टर युरी माझेई हे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे अनुभवात्मक आणि कौशल्य प्रशिक्षण, श्रेणी हस्तांतरण, दुहेरी पदवी, सह पदवी, ऑनलाईन आणि प्रत्यक्ष इंटर्नशिप, कृत्रिम बुद्धीमत्ता व इतर प्रगत ज्ञानशाखात अध्ययन व संशोधन व्हावे यासाठी मुंबई विद्यापीठाने विविध देशासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत. वैश्विक ज्ञानाच्या देवाणघेवाण प्रक्रियेमुळे विविध देशांतील शिक्षण प्रणालींमध्ये विकसित होत असलेल्या परस्परसंवादाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. - प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू

टॅग्स :मुंबईविद्यापीठरशिया