Join us  

मुंबई विद्यापीठाचे अधिकारी औरंगाबादेत परतलेच नाहीत  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 8:57 PM

मुंबई विद्यापीठाने आॅनलाईन उत्तरपत्रिका तपासण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे पाठवल्या होत्या. यासाठी मुंबईहून विद्यापीठाचे अधिकारी औरंगाबादेत दाखल झाले. मात्र तांत्रिक आडचणींमुळे आॅनलाईन उत्तरपत्रिका तपासण्यासाठी उघडल्याच नाहीत.

औंरंगाबाद, दि. ३ - मुंबई विद्यापीठाने आॅनलाईन उत्तरपत्रिका तपासण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे पाठवल्या होत्या. यासाठी मुंबईहून विद्यापीठाचे अधिकारी औरंगाबादेत दाखल झाले. मात्र तांत्रिक आडचणींमुळे आॅनलाईन उत्तरपत्रिका तपासण्यासाठी उघडल्याच नाहीत. या  अडचणी दूर करण्यासाठी अधिकारी मुंबईत परतले. यास चार दिवस झाले तरी पुन्हा परतलेच नसल्याचे स्पष्ट झाले. यास प्रभारी अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांनी दुजोरा दिला.

मुंबई विद्यापीठाने यावर्षीपासून सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका आॅनलाईन तपासण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय विद्यापीठाच्या अंगलट आला. बहुतांश अभ्यासक्रमांचे निकाल रखडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअर धोक्यात आल्यामुळे राज्यपालांनी हस्तक्षेप करत ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल लावण्याचे आदेश कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना दिले होते. ही डेडलाईन गाठण्यासाठी मुंबई विद्यापीठने नागपूर, पुणे आणि औरंगाबादच्या विद्यापीठाकडे उत्तरपत्रिका तपासून देण्याची मदत मागितली. त्यास सर्व विद्यापीठांनी प्रतिसाद देत उत्तरपत्रिका तपासून देण्याची तयारी दर्शविली होती. यातील औरंगाबादच्या विद्यापीठात मुंबई विद्यापीठातील काही अधिकारी दाखल होत ग्रंथालयातील संगणकांची पाहणी केली. त्याठिकाणी उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यात तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. तेव्हा तेथून सर्व यंत्रणा व्यवस्थापनशास्त्र विभागात हलविण्याचा निर्णय झाला. त्याठिकाणीही तांत्रिक अडचणी काही सुटल्या नाहीत. उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी मुंबईतील तंज्ज्ञाशी संपर्क साधला. मात्र त्यातुन काही फलनिष्पत्ती झाली नाही. यामुळे मुंबई विद्यापीठाचे अधिकारी ३० जुलै रोजी परतले. एक दिवसात हे अधिकारी परत येणार होते. मात्र ते अधिकारी काही औरंगाबादेत परत आलेच नाहीत. तिकडेही राज्यपालांनी दिलेली डेडलाईन मुंबई विद्यापीठाला पूर्ण करता आली नाही.