मुंबई विद्यापीठ हे कलाकारांसाठी व्यासपीठ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 06:02 AM2018-08-28T06:02:43+5:302018-08-28T06:03:58+5:30
कुलगुरू : युवा महोत्सवाची अंतिम फेरी सुरू
मुंबई : मुंबई विद्यापीठ हे कलाकारांसाठी व्यासपीठ आहे. विद्यापीठाने युवा महोत्सवाच्या माध्यमातून अनेक तरुण कलावंत घडविले आहेत. येथील कलाकारांनी सादर केलेली बहारदार कला ही सातासमुद्रापार पोहोचली आहे. भविष्यातही त्यांच्या कलागुणांचा आविष्कार केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही होणार असून, त्या दिशेने प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले. मुंबई विद्यापीठातर्फे ५१व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभ सभागृहात आयोजित केलेल्या या उद्घाटन सोहळ्याला प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
अभिनेते संजय नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन दशेत या क्षेत्रात येण्यासाठी केलेला संघर्ष विशद केला. प्रत्येक कलाकाराने लढावू वृत्ती अंगी जोपासून अथक परिश्रम करण्याचा मूलमंत्रही त्यांनी या वेळी दिला. मुंबई विद्यापीठातर्फे ४ ते २४ आॅगस्टदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या युवा महोत्सवाची प्राथमिक फेरी २८० महाविद्यालयांत पार पडली. नृत्य, नाट्य, वाङ्मय, ललितकला आणि संगीत या पाच कला प्रकारांतील ४३ स्पर्धा प्राथमिक फेरीच्या स्वरूपात ११ विभागांतून आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये २८० महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यात जवळपास १८ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
आता अंतिम फेरीसाठी विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी सज्ज झाले आहेत. अंतिम फेरीच्या स्पर्धा या विद्यापीठाने नेमलेल्या विविध महाविद्यालयांत पार पडणार आहेत.