मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 07:04 AM2024-10-21T07:04:34+5:302024-10-21T07:05:53+5:30
१९ आणि २० नोव्हेंबरला असणाऱ्या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधानसभा निवडणुकीत विद्यार्थ्यांना मतदान करता यावे यासाठी मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १९ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबरला होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र, या दिवशी मुंबई विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. परिणामी, विद्यार्थ्यांना मतदानापासूनच वंचित राहावे लागले असते. तसेच मुंबई वगळता अन्य जिल्ह्यांतील बहुतांश विद्यार्थ्यांचे मतदान गावी असल्याने त्यांना या कालावधीत प्रवास करून गावी जाणे शक्य नव्हते.
या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. त्याबाबतचे पत्र युवा सेनेने (शिंदे गट) विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या प्रमुख डॉ. पूजा रौंदळे यांना दिले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे.
परीक्षांच्या नव्या तारखा
- १९ नोव्हेंबरला होणाऱ्या परीक्षा ३० नोव्हेंबरला घेण्यात येईल.
- २० नोव्हेंबरच्या परीक्षा ७ डिसेंबरला घेतल्या जातील.
२१ नोव्हेंबरचा पेपरही नंतर घ्या
'१९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीतील परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र, विद्यापीठाने केवळ १९ आणि २० नोव्हेंबरची परीक्षा पुढे ढकलली आहे. परंतु, मुंबईपासून गाव दूर असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना २० तारखेला मतदान करून २१ तारखेला परीक्षेसाठी पोहोचणे अशक्य होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने २१ नोव्हेंबरची परीक्षाही पुढे ढकलावी, अशी मागणी युवा सेनेचे उपसचिव सचिन पवार यांनी केली आहे.