Join us

विद्यापीठाने हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी आणि संघटनेच्या मागणीनंतर निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 6:30 AM

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा १० ऑक्टोबरपासून सुरू होणार होत्या. मात्र, त्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा १० ऑक्टोबरपासून सुरू होणार होत्या. मात्र, त्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, लवकरच या परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येतील, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन संचालक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

माटुंगामधील डीजी रूपारेल महाविद्यालय, परळमधील महर्षी दयानंद महाविद्यालय, विक्रोळीतील विकास महाविद्यालय, वांद्रे येथील रिझवी महाविद्यालय, नॅशनल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला पत्र पाठवले होते. मात्र, विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांकडून ती पत्रे फेटाळून लावण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी युवासेनेकडे धाव घेतली. युवासेनेने विद्यार्थ्यांची बाजू समजून घेत गुरुवारी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांना घेराव घातला, तसेच पाचव्या सत्राची परीक्षा दिवाळीनंतर घेण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या  परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करून २०२२ च्या हिवाळी सत्राच्या सत्र ५ बरोबरच सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

एकूण ४५० हून अधिक परीक्षा 

मुंबई विद्यापीठ २०२२ च्या हिवाळी सत्रामध्ये  वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव्य विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा व  आंतरशाखीय विद्याशाखा, अशा चार विद्याशाखांच्या ४५० पेक्षा जास्त परीक्षा घेणार आहे.

२०२२ च्या हिवाळी सत्राच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचे नियोजन आहे. सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. -डॉ. प्रसाद कारंडे, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, मुंबई विद्यापीठ

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मुंबई विद्यापीठ