उन्हाळी सत्राच्या निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठ सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:30 AM2019-05-25T00:30:50+5:302019-05-25T00:30:53+5:30
मूल्यांकनावर लक्ष : ७ जिल्ह्यांत ९० समन्वयकांची नियुक्ती
मुंबई : २०१९ चे उन्हाळी सत्राचे निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठातील परीक्षा विभाग सज्ज झाला असून विविध परीक्षांचे निकाल निर्धारित वेळेत लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर ७ जिल्ह्यांमध्ये ९० समन्वयक मूल्यांकनावर लक्ष ठेवून आहेत. मूल्यांकनासाठी महाविद्यालयाशी ते सतत संपर्कात आहेत. परीक्षा विभागाने या सत्राचे मूल्यांकन निर्धारित वेळेत करण्यासाठी जिल्हानिहाय समन्वयकांची तसेच समन्वय समितीची नेमणूक केली असल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या बी.कॉम व बी.ए सत्र ६ च्या परीक्षांचे मूल्यांकन अंतिम टप्प्यात आले असून या सत्राचे निकाल निर्धारित वेळेत लावण्यासाठी मुंबई विद्यापीठाने विविध उपाययोजना केलेल्या आहेत. तसेच आतापर्यंत उन्हाळी सत्राचे २० निकाल जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षा विभागाने दिली आहे.
बी.कॉमचा निकाल अंतिम टप्प्यात
बी.कॉम सत्र ६ चे मूल्यांकन १००% पूर्ण झाले असून निकालाचे कार्य अंतिम टप्प्यात आहे. याचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल. तसेच बी.ए. सत्र ६ चे मूल्यांकनही ८०% पेक्षा जास्त झाले असून उर्वरित मूल्यांकन पूर्ण करून याचाही निकाल वेळेत जाहीर करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचे परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांच्या संख्येत वाढ
या परीक्षेपासून महाविद्यालयाला त्यांच्या विद्यार्थी संख्येच्या दीडपट कोटा देण्यात आलेला आहे, त्यानुसार महाविद्यालय आपला कोटा पूर्ण करीत आहे. यामुळे मूल्यांकन करणाºया शिक्षकांच्या संख्येत वाढ झालेली आहे. २०१८ च्या हिवाळी सत्रामध्ये १५,५५५ एवढे शिक्षक मूल्यांकन करीत होते. सध्या या शिक्षकांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून सध्या मूल्यांकन करणाºया शिक्षकांची संख्या १७,७५१ एवढी झाली आहे. अजूनही मूल्यांकन करणाºया शिक्षकांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे.
अंतर्गत गुणासाठी निर्धारित तारीख
विविध परीक्षांचे अंतर्गत गुण महाविद्यालयाला परीक्षा विभागाकडे देण्यासाठी निर्धारित तारीख देण्यात आली आहे. कारण काही महाविद्यालये अंतर्गत गुण वेळेवर देत नसल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले. यामुळे अंतर्गत गुणासाठी या वेळेपासून महाविद्यालयाला निर्धारित तारीख देण्यात आलेली आहे.
आॅनलाइन उपस्थिती
हिवाळी सत्राच्या परीक्षेपासून सर्व महाविद्यालयामध्ये आॅनलाइन उपस्थिती करण्यात आली होती. त्या वेळी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेली आॅनलाइन उपस्थिती ही उन्हाळी परीक्षेपासून बंधनकारक करण्यात आलेली आहे. सर्व महाविद्यालये आता आॅनलाइन उपस्थिती करीत आहेत.
उन्हाळी सत्राचे निकाल वेळेत लावणे ही विद्यापीठाची प्राथमिकता आहे. यानुसार प्राचार्य व शिक्षकांच्या सहकार्याने हे निकाल वेळेत लावण्यात येतील असा मला विश्वास वाटतो.
- डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ