Join us  

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांना स्थगिती; विद्यार्थी संघटनांकडून निर्णयाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 5:55 AM

विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक परिपत्रक काढत मुंबई विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत नोंदणीकृत पदवीधर गटाच्या सिनेट निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली. ९५ हजार मतदारांची अंतिम यादी आणि उमेदवारांचे निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना अचानक निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती दिल्याने राजकारण तापले आहे. विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. 

भाजप आमदार आशीष शेलार यांनी दिलेल्या पत्रावरून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई विद्यापीठाला १७ ऑगस्ट रोजी पत्र पाठविले आणि त्यानंतर निवडणूक रद्द झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. नोंदणीकृत पदवीधर गटाच्या खुल्या प्रवर्गातील पाच आणि राखीव प्रवर्गातील पाच जागांसाठी १० सप्टेंबर रोजी मतदान होणार होते. त्यानंतर १३ सप्टेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार होता. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आशीष शेलार यांच्या पत्राची दखल घेत १७ ऑगस्टला मुंबई विद्यापीठाला पत्र पाठवत दुबार मतदार यादीसंदर्भात चौकशी होईपर्यंत निवडणूक जाहीर करू नयेत, असे आदेश दिले होते. 

ऐनवेळी निर्णय का घ्यावा लागला?

पहिल्यांदाच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाची युवा सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने मोठ्या प्रमाणात पदवीधरांची मतदार म्हणून नोंदणी करून घेतली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार होता. 

शिंदे गटाची नोंदणी कमी झाल्याचे म्हटले जात होते. दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही ताकद लावली होती. सर्व गटाच्या उमेदवारांनी अर्ज भरण्याची पूर्ण तयारी केली होती. अभाविपने सिंधदुर्ग, रत्नागिरीपासून मुंबईपर्यंत बैठका घेऊन उमेदवार दिले होते. मात्र त्यानंतरही निवडणुकीला स्थगिती का दिली, असा सवाल केला जात आहे.

 

टॅग्स :मुंबई विद्यापीठ